या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेचा भूखंड दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न

जागेसाठी पैसे घेऊ नही जागा न दिल्याने तसेच पैसे देण्यासही टाळाटाळ करत असल्याच्या आरोपावरून बदलापूर नगरपालिकेतील शिवसेना पक्षाचे स्वीकृत नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कनोजीया असे तक्रारदाराचे नाव असून त्यांचे लॉन्ड्रीचे दुकान आहे.

बदलापूर पश्चिमेतील उड्डाणपुलाजवळ नाल्याशेजारी नगरपालिकेची जागा आहे. भगीरथी गार्डन शेजारी असलेल्या या जागेवर एका विकसकाने बेकायदा बांधकाम केले आहे. हे विकण्यासाठी याआधी काही राजकीय नेत्यांकडून प्रयत्न झाल्याची चर्चा होती. येथील सव्‍‌र्हे क्रमांक २८ अच्या हिस्सा नं ३/५ मधील ४०० चौरस मीटर क्षेत्रफळातील ५० मीटर चौरस मीटर जागा घर बांधण्यासाठी विकत देण्यासाठी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांनी सुनील कनोजीया याच्याकडून चेकद्वारे चार लाख रुपये घेतल्याची तक्रार पुढे आली आहे. अशी जागा विकण्याचे अधिकार मुळात टांकसाळकर यांना नव्हते. शिवाय घेतलेले पैसेही परत देत नसल्याची तक्रार कनोजीया यांनी पोलीस ठाण्यात नोंदविताच हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी टांकसाळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

पालिकेची संदिग्ध भूमिका

दरम्यान, पालिका सभागृहात बेकायदा बांधकाम लपवण्यासाठी तेथे समाज मंदिराची निर्मिती करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. त्यासाठी सर्वसाधारण सभेतही हा विषय विषयपटलावर आणण्यात आला. मात्र गदारोळाची शक्यता वाटताच तो पुढील चौकशी आणि अहवाल येईपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतरच्या काळात येथे पाळणाघर होईल, असे सांगण्यात येत होते. याआधीही या बेकायदा जमिनीच्या आणि त्यावर तयार झालेल्या बांधकामाच्या बाबतीत पालिकेने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याप्रकरणी पालिकेच्या भूिमकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असून याप्रकरणी यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating case on shiv sena corporator in badlapur
First published on: 26-08-2016 at 01:37 IST