tvlogलनाटय़ाचा कुठलाही प्रयोग मुंबईतील कुठल्याही नाटय़गृहात पाहिला तर हमखास दिसणारे चित्र म्हणजे रिकामे थिएटर आणि उत्साही कलाकार, तरीही आशावादी निर्माते आणि दिग्दर्शक असेच चित्र पाहायला मिळते.
दरवेळी चांगली बालनाटय़े नाहीत म्हणून ओरड सुरू असते, पण दुसरीकडे बालनाटय़ांना अपेक्षित प्रेक्षक नाही असेही चित्र पाहायला मिळते. यावर्षी बालनाटय़ांची संख्या खूप आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रोज सकाळी अकराचा शो बालनाटय़ांचा आहे. तर एक दिवस गडकरीचा असाही होता की सकाळी अकरापासून रात्री शेवटच्या शोपर्यंत म्हणजे दिवसाचे तीन्ही शो बालनाटय़ांचे झाले. यावरून बालनाटय़ करणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज बांधता येतो, पण त्या तुलनेत प्रेक्षक कुठे आहे?
जर उणेपुरे अर्धे सभागृह भरले तर बालनाटय़ातील काम करणाऱ्या मुलांच्या पालकांनी तिकीट विक्रीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन तिकीट विक्री केली आहे हे समजावे. पण त्याही नाटकाला चालू बुकिंग किती, याचा आकडा पाहिला तर चिंतेचे वातावरण आहे. गडकरीची परिस्थिती त्यातल्या त्यात बरी आहे. पण डोंबिवली, दादर, पार्ले आणि बोरिवलीमध्ये केवळ दहा-पंधरा लोकांच्या उपस्थितीत प्रयोग होतात.
या नाटकांसाठी नाटय़गृहाच्या भाडय़ात सवलत देण्यात आली आहे तर बालनाटय़ात काम करणाऱ्या शिबिरार्थी मुलांकडून आयोजक शुल्क स्वरूपात पैसे घेतात हे जरी खरे असले तरी नाटक म्हटले की त्याचा खर्च आला. प्रयोगाला होणारा खर्चही त्या प्रयोगाच्या बुकिंगमधून निघत नाही.
पु. ल देशपांडे, सई परांजपे, रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या मान्यवर लेखकांची बालनाटय़ेही अजून काही संस्था करतात, मग ती हाऊसफुल जातात का? या प्रश्नाचे उत्तर कधीतरी असा प्रयोग असताना तिकीट काढून सभागृहातील चित्र याची देही याची डोळा पाहिलेले बरे. हां, हेही नाकारता येणार नाही की सगळीच बालनाटय़े चांगली असतात. काही संस्था संहिता नसलेली बालनाटय़े सादर करतात, पण कुठले नाटक पाहायचे आणि कुठले नाही हे ठरविण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहेच की!
हे चित्र यावर्षीचे नाही, ते गेल्या अनेक वर्षांचे आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेनेही काही अंशी पुढाकार घेतला आहे. त्यांनीही बालनाटय़ांना प्रोत्साहन देण्यासाठी बालनाटय़ महोत्सव सुरू केला आहे. मध्यंतरी तो बंद होता, पण आता पुन्हा सुरू झाला आहे. अन्य शहरांमध्येही असा प्रयत्न होण्याची गरज आहे. शाळांना सुट्टी पडली आहे. घरच्यांना वेळ नाही. कॉम्युटरवरील गेममध्ये ती गुंतत आहेत. या बालप्रेक्षकाला नाटय़गृहाकडे आणायला हवे. त्यासाठी दानशूर व्यक्ती आणि शाळांनी पुढाकार घ्यायला हरकत नाही.
बालनाटय़ांमध्ये काम करणाऱ्या कलाकरांचे नेहमीच कौतुक वाटते. सभागृह भरलेले असो वा अर्धे रिकामे किंवा चार-दोन माणसे सभागृहात असोत ते प्रयोग मात्र तेवढय़ाच उत्साहात करतात. नाहीतरी रंगभूमी कलावंताचा धर्मच आहे- शो मस्ट गो ऑन.. तो बालकलाकार पाळतात.