ठाणे शहरातील कलेचा वारसा जतन करताना बालमनातील सुप्त कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चिल्ड्रन थिएटर आकादमीच्या वतीने डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात तीन दिवशीय बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लहानग्यांनी एकत्र येऊन सादर केलेले नाटकाचे प्रयोग उपस्थितांची दाद मिळवून गेले.
या महोत्सवामध्ये  हत्तीचे लग्न, टेडी आणि डोरेमॉन, फुग्यातील राक्षस, प्रोजेक्ट अदिती, गोष्ट सिम्पल पिल्लांची ही बालनाटय़ सादर झाली. लहानग्यांसाठी त्यांच्या आवडीचे मिकी आणि भीम, गुब्बारेवाला राक्षस या इंग्रजी बालनाटय़ांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांसोबत पालकांनीही बालनाटय़ांचा आस्वाद घेतला.
व्हिडियो गेमच्या जगात हरवलेल्या मुलांसाठी मुखवटे व बाहुल्यांचे खेळ येथे उपलब्ध करुन देण्यात आले होते. शहरी जीवनाचे दर्शन घडविणारा ‘आई-बाबा हरवले’, ‘जादूचे घर’ अश्या नाटय़कृती या महोत्सवात सादर करण्यात आल्या. बाल कलाकारांनी सादर केलेला ‘फॅशन शो’ अतिशय प्रभावी ठरला; तर चेहरे रंगवणे, टॅटू काढणे, सेल्फी फोटो असे मजेदार उपक्रमही यावेळी राबवण्यात आले. तसेच ‘कार्टूनगीरी’ हा हास्य व्यंगचित्राचा कार्यक्रमही यावेळी सादर झाला. हल्लीच्या धावपळीच्या जगात हरवलेले काही खेळही येथे सादर झाले. कळसुत्री बाहुल्यांचा प्रयोग, श्ॉडो शो, जादुचे प्रयोग आदी खेळांची पर्वणी लहानग्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. मनोरंजक खेळासोबत मंजीर देव यांच्या नृत्यांने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले. कर्णबधीर मुलांनी मुकनाटय़ सादर करून आपणही या कलेत मागे नसल्याचे दाखवून दिले.