ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, आकाशकंदिल खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

ख्रिस्ती धर्मीयांचा महत्त्वाचा सण असलेला नाताळ दहा दिवसांवर येऊन ठेपलेला असून त्यानिमित्त वसई-विरारमधील बाजारपेठा सजल्या आहेत. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, बेल्स, आकाशकंदिल, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू, येशूच्या मूर्ती यांनी अनेक दुकाने सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली असल्याचे दिसून येत आहे.

नाताळ सण साजरा करण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील चर्चमध्ये सजावट आणि रंगरंगोटीच्या कामांना सुरुवात झाली आहे. घर सजवण्यासाठी विविध वस्तू लागतात, या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे व रंगांचे दिवे खरेदी करण्यात येत आहेत. सांताक्लॉज हे ख्रिसमसचे महत्त्वाचे आकर्षण आणि लहानग्यांचे कुतूहल असल्याने सध्या सांताक्लॉजचा वेश खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. वसईत अनेक तलावांमध्ये तरंगते गोठे उभारले जातात. त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात येते. तयार गोठे आणि त्यावर रोषणाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीही वाढली आहे. यंदा वसईत नवीन फनी गॉगल दाखल झाले आहेत. मुख्य म्हणजे लहानांपासून मोठय़ांनाही त्याचे आकर्षण असून ते खरेदी करण्यात येत आहेत. वसईतील जीवनदर्शन केंद्रात अनेक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. ट्री सजावट साहित्य, म्युझिकल लाइट्स, पुतळा, नेटिव्हिटी सेट, हेअर बँड, विविध गाणी असलेली सीडी, सांताक्लॉज, तोरण, रिंग आदी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.