कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदान करावे यासाठी शहराच्या विविध भागांतील जागरूक नागरिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी फलक रस्त्यावर लावून, काहींनी गट बैठका घेऊन, तर काहींनी आपल्या मित्रपरिवारांच्या भेटी घेऊन मतदानासाठी बाहेर पडा, असा उपक्रम सुरू केला आहे.
पालिका प्रशासनाने आपल्या प्रभाग कार्यालयांमध्ये मतदार जनजागृतीचे फलक लावले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनातर्फे विविध प्रभागांत पथनाटय़ सादर करून मतदान करण्याचे संदेश नागरिकांना दिले जात आहेत.
कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रस्त्यावरील भोई समाज संस्थेचे संजय कोजे यांनी मतदान हा आपला हक्क आहे. तो बजावण्यास विसरू नका, म्हणून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली, की मतदार घराबाहेर पडत नाहीत. अशा मध्यमवर्गीय वस्त्यांत जाऊन कोजे हे आपली नोकरी सांभाळून जनजागृती करीत आहेत. गेल्या आठवडय़ापासून पालिका निवडणुकीसाठी आपण हे काम सुरू केले आहे, असे कोजे यांनी सांगितले. आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत मतदान होत आले आहे.
‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी डोंबिवली परिसरातील महाविद्यालयीन तरुण, विविध सोसायटय़ांमध्ये जाऊन मतदार जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहरविकास हवा असेल, तर मतदारांनी अधिक संख्येने बाहेर पडून चांगले उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन बिवलकर यांच्या गटातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.
कल्याणमधील एक ज्येष्ठ व जागरूक नागरिक विष्णू पाटणकर यांनी आपल्या नियमित बैठका, ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन पालिका निवडणुकीसाठी बाहेर पडा आणि चांगले उमेदवार निवडून द्या म्हणून गेल्या काही दिवसांपासून उपक्रम सुरू केला आहे. पालिकेतील एकूण कारभार, वर्तमानपत्रात पालिकेविषयी प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या पाहून नागरिक लोकप्रतिनिधी, पालिकेच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसते. अनेक जण कोणाला मतदान करायचे, अशा संभ्रमात आहेत. अशा मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न आपण आपल्या परीने करीत आहोत, असे पाटणकर यांनी सांगितले.