कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपने प्रचाराचा केंद्रिबदू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच कायम ठेवला असून कल्याणमधील कोणत्याही निवडणुकीत एरवी सक्रिय दिसणारे विद्यमान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण डोंबिवलीत कोणतीही निवडणूक असली तरी भाजपची यंत्रणा विनोद तावडे आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्याभोवती फिरत होती. डोंबिवलीलगतच्या २७ गावांलगत कल्याण विकास केंद्र आणि त्यासाठी १२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पूर्णपणे अंधारात ठेवले. त्यानंतर २७ गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेऊन स्थानिक राजकारणात स्वत: मुख्यमंत्रीही उतरल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटी योजनेच्या सादरीकरणानिमित्त डोंबिवलीत येऊन मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी तब्बल ६५०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. तत्पूर्वी महापालिकेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करून सेनेसह भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आग्रहालाही मुख्यमंत्र्यांनी दाद दिली नाही. पालिका निवडणुकीला सामोरे जाताना करावयाच्या पुर्वतयारीचा हा भाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे. प्रचाराचा चेहरा मुख्यमंत्री राहिले आहेत.