कार्यालयाचे भाडे परवडणारे नसल्यामुळे आयोजकांची पंचाईत

शहरात बाकी सर्व काही मिळेल, पण जागा मिळणे मुश्कील आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी स्वीकारलेले डोंबिवलीतील आयोजक सध्या त्याचा पुरेपूर अनुभव घेत आहेत. साहित्य संमेलनाची घोषणा होऊन एक महिना उलटला तरी अद्याप संमेलन कार्यालयासाठी जागा मिळालेली नाही. महापालिकेच्या कॉमर्स प्लाझा इमारतीतील एक जागा आयोजकांनी पाहिली आहे. मात्र त्या जागेचे एक लाख रुपये मासिक भाडे परवडणारे नाही. त्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने भाडे कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र संमेलनावर भाजपचे वर्चस्व असल्याने नाराज असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने कार्यालयाच्या जागेच्या भाडय़ात सवलत न देता एक प्रकारे आयोजकांची कोंडी केली असल्याची चर्चा सदस्यांमध्ये रंगली आहे. मात्र हा तिढा लवकरच सुटेल, अशी आशा आयोजक बाळगून आहेत.

डोंबिवलीतील साहित्य संमेलन वैशिष्टय़पूर्ण व्हावे, यासाठी आयोजक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र संमेलनाचे कार्यालय शोधताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. ५ डिसेंबरपासून ‘आगरी महोत्सवा’ची सुरुवात होत आहे. मासिक एकलाख रुपये भाडे हे फोरमला परवडणारे नसल्याने सध्या फोरम संभ्रमात पडली आहे. भाडे कमी करण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप नगरसेवकांकरवी विनंती करण्यात आल्याचे समजते. सवलतीत भाडे भरण्याची आयोजकांनी तयारी आहे.

अव्वाच्या सव्वा भाडे

‘आगरी महोत्सव’ व ‘साहित्य संमेलन’ दोन्हीची जबाबदारी पार पाडता यावी म्हणून फोरमचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी सध्या आगरी युथ फोरमचे कार्यालय असलेल्या मानपाडा रोडवरील कॉमर्स प्लाझा या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील १६०० चौरस फूट जागेची निवड केली आहे. ही जागा फोरमला मिळाल्यास ‘आगरी महोत्सव’ आणि ‘साहित्य संमेलन’ अशा दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडता येणार आहे. मात्र या जागेवर कल्याण-डोंबिवली महापालिकेची मालकी आहे. पूर्वी या १६०० चौरस फूट जागेत स्थानिक संस्था कर (एलबीटी)चे कार्यालय होते. सध्या ही जागा रिकामी आहे.यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने मासिक एक लाख रुपये भाडे सांगितले आहे.