मालजीपाडा गावातील अनोखी प्रथा; गावाच्या वेशीबाहेर जमून सामूहिक जेवणाचा आनंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या मालजीपाडा आणि बोबदपाडा या दोन्ही गावांमध्ये अनेक वर्षांपासून एक आगळीवेगळी प्रथा आहे. वर्षांतील एका दिवशी या गावातील एकाही घरात चूल पेटत नाही. गावातील सर्व ग्रामस्थ या दिवशी गावाच्या वेशीवर येतात. वेशीवरच स्वयंपाक केला जातो आणि त्यानंतर तिथेच सहभोजन केले जाते. गावातील सर्वानी एकत्र यावे, त्यांच्यात सामाजिक एकोपा कायम राहावा आणि एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेता यावीत या उद्देशाने ‘गावटाकणी’ नावाची ही अनोखी प्रथा आजही या गावात पाळली जाते. गेल्या रविवारी (२८ मे) या दोन्ही गावांत ‘गावटाकणी’ प्रथा पाळण्यात आली.

रविवारी संध्याकाळी या गावांमधील ग्रामस्थ वेशीबाहेर जमले आणि त्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. पूर्वी गावाबाहेरील जंगलात वनभोजन करण्याची प्रथा होती, हीच प्रथा पुढे गावटाकणी प्रथा म्हणून पुढे प्रचलित झाली. वर्षांतून एकदा गावटाकणी साजरी केली जाते. दर वर्षांच्या मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे परस्परांतील स्नेहभाव वाढीस लागतो. एकमेकांतील दुरावा दूर होण्यास त्यामुळे मदत होते आणि गाव एकसंध राहतो, अशी येथील ग्रामस्थांची धारणा आहे. या दिवशी घरातील चुलीलाही आराम मिळतो, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. काळ बदलला तरी मालजीपाडा व बोबदपाडा या दोन गावांनी ही अनोखी प्रथा अजूनही अबाधित ठेवली आहे. साधारण दरवर्षी मे महिन्याच्या शेवटचा रविवार निवडण्यात येतो. आदल्या दिवशी देवीची पालखी काढली जाते. गावातील सगळे पालखीचे दर्शन करतात आणि मग रविवारी वनभोजनाला एकत्र येतात. या गावटाकणीत सगळे ग्रामस्थ आवर्जून हजर असतात. या दिवशी गावात शुकशुकाट असतो.

रविवारी आमच्या गावातील सर्वच ग्रामस्थ एकत्र जमले आणि गावाजवळील जंगलात स्वयंपाक केला आणि सर्वानी सहभोजनाचा आनंद घेतला. ही आमच्या पूर्वजांची प्रथा आहे. आम्ही ती कायम ठेवली आहे. यामुळे केवळ परंपरेचे जतन होत नाही, तर गावातील सर्व जण एकत्र येतात, गप्पा-गोष्टी करतात आणि आनंदाचा सोहळा साजरा करतात.

सतीश म्हात्रे, सरपंच, मालजीपाडा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collective meal vasai story
First published on: 01-06-2017 at 02:11 IST