कुशिवली परिसरात २५ हजार झाडे लावणार

श्रीमलंग गड परिसरातील गावांमधील पाणीटंचाई दुर व्हावी यासाठी या भागातील जलयुक्त शिवार प्रकल्पाची कामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह बुधवारी कल्याणकर यांनी या भागाची पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार हेदेखील होते. यावेळी खरड येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ तात्काळ करण्यात आला. कुशिवली परिसरात २५ हजार झाडे लावण्याचे ठरविण्यात आले.

बुधवारी करण्यात आलेल्या संयुक्त पहाणीत खरड, काकडवाल, कुशिवली, करवले, पोसरी-शेलारपाडा, चिंचवली येथील बंधाऱ्यांची उंची वाढवणे, गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे, तसेच उसाटणे येथील तलावाचे खोलीकरण करण्याची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी दिले. हे तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ गेल्या वर्षी खासदार शिंदे यांनी पुढाकार घेऊ न काढला होता. त्यामुळे येथे पाणी साठवण्याची क्षमता काही कोटी लिटरने वाढली आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. मात्र, काही बंधाऱ्यांची उंची वाढविण्याची आवश्यकता असून गळती रोखण्यासाठी डागडुजी करण्याचे प्रस्ताव तयार करावे लागणार असल्याने यासंबंधी तातडीने पाउले उचलण्यात यावीत, असे निर्देश कल्याणकर यांनी यावेळी दिले.

दरम्यान, कुशिवली येथील वनबंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश डॉ. कल्याणकर यांनी यावेळी लघुपाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंते प्रभाकर यांना दिले. तसेच, चिंचवली येथील दोन बंधाऱ्यांची उंची वाढवण्याचे काम आठवडय़ाभरात सुरू करण्याचे आदेश दिले. करवले येथील बंधाऱ्यात गाळ काढणे आणि उंची वाढविण्याच्या कामालाही त्वरित सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्यात येतील व त्यासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही, याबाबत कल्याणकर यांनी खासदार शिंदे यांना आश्वस्त केले.

पावसाचे पाणी अडवा

मलंग परिसरात पावसाचे पाणी अडविण्यास मोठय़ा प्रमाणावर वाव असून त्यामुळे येथील शेतीचा विकास करणे देखील शक्य असल्याचे खासदार शिंदे म्हणाले. गेल्या वर्षी केलेल्या कामांमुळे या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भाजीपाला घेणे शक्य झाले असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकत्याच पार पडलेल्या खरीप हंगामाच्या बैठकीत मलंग परिसरात पाणी अडवण्याकरता स्वतंत्र आराखडा करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले  आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

तहसीलदार तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी आठवडय़ातून दोन दिवस या भागातील गाळ काढणे, दुरुस्तीची कामे व्यवस्थित होते आहे किंवा नाही ते पाहावे असे सुचविण्यात आले आहेत. जलयुक्तसाठी मिळालेल्या निधीतून बंधारे दुरुस्तीसंबंधी विहित पद्धतीने पैसे द्यावे तसेच कृषी व मनरेगाच्या कामांचाही यात समावेश करावा, अशा सूचना कल्याणकर यांनी दिले आहेत. याच भागात २५ हजार रोपांच्या लागवडीचा निर्णय झाला आहे.