कोपरी उड्डाणपुलाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडल्याने ९ कोटींचा प्रकल्प १३२ कोटींवर पोहोचला आहे, परंतु यासंदर्भातील बऱ्याचशा अडचणी दूर झाल्या असून येत्या ३१ मार्चआधी कार्यादेश काढून कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. पुलाच्या कामावर देखरेख आणि येणाऱ्या अडचणी, तसेच प्रशासकीय त्रुटी जाणून घेण्यासाठी मुंबई विभागातील मुख्य अभियंत्याची एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे-नाशिकला जोडणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी उड्डाणपुलाच्या चार अतिरिक्त लेन वाढविण्याबाबत मुंब्रा कळवाचे आमदार जितेंद्र आव्हाड व इतर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले, या पुलासंदर्भात २००१ पासून १६ बैठका झाल्या, परंतु रेल्वेच्या कार्यपद्धतीमुळे पुलाच्या कामास विलंब झाला आहे, परंतु गेल्या एका वर्षांत रेल्वेची परवानगी घेण्यात सरकारला यश आले आहे. एमएमआरडी येत्या ३१ मार्चआधी कार्यादेश काढून कामाला सुरुवात करणार आहे. या कामाला १२ जानेवारी २००१ ला राज्य सरकारने मान्यता दिली होती.

ठाण्यातील आदिवासी मुलांचे
वसतिगृह स्थानांतरित होणार
ठाण्यातील आदिवासी मुलांचे वसतिगृहात असुविधा असून लवकरच हे वसतिगृह इतरत्र स्थानांतरित करण्यात केले जाणार आहे. शिवाय आदिवासी शाळांमधील मुख्याध्यापकांना वह्य़ा आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. कोळवाडी, पनवेल व वाडा येथील आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, तसेच आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी विविध मागण्यांसाठी ३० ऑगस्ट २०१५ ला आपापल्या वसतिगृहाच्या आवारात उपोषणाला बसले होते.