कल्याण-डोंबिवली शहराला घनकचरा आणि प्रदुषण या समस्यांनी ग्रासले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी नाईलाजाने उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. गावपातळीवर या समस्या सोडविण्याची आता वेळ आली असून त्यासाठी नागरी परिषदेसारखी एखादी विशेष समिती स्थापन झाली पाहिजे, असा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरु अशोक प्रधान यांनी येथे एका कार्यक्रमात दिला.
नागरी सत्कार समिती, डोंबिवली यांच्या वतीने रविवारी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात आला. पं. सदाशिव पवार (संगीतक्षेत्र), डॉ. श्रीराम कुळकर्णी (वैद्यकीय क्षेत्र), सिंधुताई भुस्कूटे (स्त्री सक्षमीकरण), अप्पासाहेब दिघे (परिसर संवर्धन), गुरुदास तांबे (देहदान अवयवदान), अप्पा जोशी (वनवासी) यांचा सत्कार करण्यात आला.
अशोक प्रधान पुढे म्हणाले, नागरी सत्कार समितीच्या माध्यमातून शहरातील २६ संस्था एकत्र आल्या आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. या संस्थांच्या एकत्रिकरणातून शहरातील प्रश्न नक्कीच सुटतील. अशा संस्थांना सर्वसामान्य नागरिकांचीही साथ लाभली पाहीजे. प्रश्न सोडविताना संस्थांना येणाऱ्या अडचणी त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. नागरी परिषदेसारखी समिती स्थापन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी अशा प्रकारची समिती कल्याणमध्ये अस्तित्वात होती. ती पुन्हा निर्माण व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. समाजाचे प्रश्न सोडविण्यामध्ये तरुणांचा उत्साह कमी दिसून येतो. आपली शिक्षण व्यवस्था यात कमी पडत आहे का याचा विचार व्हायला हवा. तरुणांच्या नक्की काय समस्या आहेत याचा विचार केला पाहिजे. तरुणांची अशीच स्थिती राहीली तर पुढे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती निर्माण होणार नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.