thlogo02जून २०१२ मध्ये छत्रपती शिक्षण संस्थेतील एक शिक्षक  दिनेश भामरे यांनी फोन करून तीन विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल का, अशी विचारणा केली. या तिघींना दहावी, बारावीला चांगले गुण मिळाले होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्चशिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यांची ही विनंती मान्य करत मी लगेचच या विद्यार्थिनींना भेटण्याचे कबूल केले.  
 त्या दिवशी प्रथम आम्ही शिल्पा बोरसे हिच्या घरी गेलो. चाळीतील दोन खोल्या आणि छोटय़ा पडवीची जागा एवढय़ात बोरसे कुटुंबाचा संसार होता. शिक्षक असलेल्या शिल्पाच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. कौटुंबिक निवृत्तिवेतन अतिशय तुटपुंजे. तिची परिस्थिती पाहिली आणि तिला बारावी तसेच सीईटीच्या परीक्षेसाठी मदत सुरू करून दिली. या मुलीने बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. तिला पुढच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा विचार होता, पण मदतीसाठी तिचा अर्ज आला नाही. मी शिल्पाला फोन केला, तर तिने यामागचे कारण सांगितले. तिला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता, पण सीईटीला कमी गुण मिळाल्याने तिला त्या वर्षी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्या वर्षी ‘गॅप’ घेऊन नव्याने सीईटीची तयारी करण्याचा तिचा विचार होता. म्हणून तिने मदतीचा अर्जच केला नाही.
पुढे माझ्या अपेक्षेप्रमाणे तिला ठाण्याच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. गोरेगावमधील एका फॅमिली ट्रस्टने तिच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलली. सध्या शिल्पा वैद्यकीच्या तिसऱ्या वर्षांला आहे.   
भामरे सरांनी विचारणा केलेली दुसरी मुलगी कल्याणमधील चिकणघर येथील वैशाली खापरे. दहावीतील उत्तम गुणांवर वैशालीला वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनात इन्स्ट्रमेंटेशन या विषयाच्या डिप्लोमासाठी प्रवेश मिळाला होता. वडील व्यसनाधीन झाले होते. आई घरकाम करून कुटुंब चालवत होती. आम्ही तिला मदत करायचे ठरवले. तिने ती मदत सार्थही ठरवली.
तिसरी मुलगी कल्याणमधील वालधुनी अशोकनगर येथील रुचिरा झोपे. रुचिराच्या वडिलांचे निधन झाले होते. ती आपल्या आईसोबत मामाकडे एका झोपडपट्टीत राहात होती. . त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि मदत उपलब्ध करून दिली. रुचिराला एसएनडीटी विद्यापीठाच्या प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमासाठी प्रवेश मिळाला. सध्या तिने सातव्या सत्राची परीक्षा दिली असून कुलाबा येथील ‘टीआयएफआर’मध्ये ती सहा महिन्यांसाठी इंटर्नशिपही करीत आहे. तिला डिग्री शिक्षण पूर्ण करायचे आहे. पण तिने डिप्लोमानंतर नोकरी करून घरात आर्थिक हातभार लावला, अशी तिच्या कुटुंबाची अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षाही स्वाभाविकच आहे. यातून काही तरी मार्ग काढावा लागणार आहे.  
या तिघी छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयाच्या विद्यार्थिनी. भामरे सरांसारखा सामाजिक जाणीव असलेल्या एका शिक्षकाने त्यांची शिक्षणातील चमक हेरली आणि त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केल्याने आज या मुली चांगले शिक्षण घेत आहेत. मुलांचे भविष्य घडवण्यात शिक्षक कसा मोलाचा ठरू शकतो, याचेच हे उदाहरण.
भामरे सरांनी अशाच प्रकारे नम्रता लावंड या विद्यार्थिनीच्या मदतीसाठीही विनंती केली होती. नम्रताकडे बी.कॉम.ची फी भरण्याचे पैसे नव्हते. दात्यांनी ती अडचण दूर केली. नम्रताने बी.कॉम.मध्ये ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून त्याचे चीज केले. सध्या ती टीजेएसबी बँकेत नोकरी करीत आहे. नोकरी करतानाच तिने एम.कॉम./ जे.ए.आय.बी.चे शिक्षणही पूर्ण केले. मधल्या काळात तिच्यावरील मातृछत्रही हरपले. पण वयाच्या २४व्या वर्षी स्वत:च्या हिमतीवर ती भावंडांचे महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करीत आहे. समाजाने एकीला सावरले. आज ती दोघांचे आयुष्य घडवत आहे.
गेल्याच आठवडय़ात भामरे सरांचा पुन्हा फोन आला. ठाणे पूर्व येथील नाखवा हायस्कूलमधील दहावीत ८९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला गणेश झोडपे याच्या मदतीसाठी तो फोन होता. गणेश कळवा येथे राहात असून डोंबिवली पूर्व येथील धनाजी नानाजी चौधरी कॉलेजमध्ये अकरावी सायन्सचे शिक्षण घेत आहे. रविवारीच सायंकाळी चार वाजता गणेशला कळवा स्थानकात भेटलो. तेथून दोन रेल्वे रूळ ओलांडून फाटकाजवळील झोपडपट्टीतील त्याच्या घरी गेलो. वडिलांचे अकाली निधन झालेले. धाकटय़ा बहिणीला किडनीचा आजार असल्याने औषधे सुरू आहेत. धाकटय़ा भावाचे शिक्षण सुरू आहे. अशी त्याच्या घरची व्यथा. दहावीत मिळालेल्या गुणांबद्दल तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते गणेशचा सत्कार झाला होता, पण शिक्षणमंत्र्यांसोबत काढलेला फोटो फ्रेम करण्याचीही या कुटुंबाची परिस्थिती नाही. मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र नाही, कारण नागपूरपासून एसटीने तीन तासांवर असलेल्या गावी जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचा खर्च झेपणारा नाही.
गणेशच्या नशिबाने त्याच दिवशी संध्याकाळी एका विद्यार्थिनीला वसतिगृहाचे डिपॉझिट भरण्यासाठी दिलेले ५ हजार रुपये तिने परत आणून दिले होते. ते लागलीच गणेशकडे सोपवून मागासवर्गीय प्रमाणपत्र आणण्याच्या सूचना केल्या. बारावीनंतर तरी त्याचे शिक्षण चांगल्या महाविद्यालयातून व्हावे, अशी इच्छा आहे. गणेशला आयएएस बनायचे आहे. समाजाच्या आधाराने उच्चशिक्षण पूर्ण करून तो आयएएस नक्कीच होईल. त्या वेळी देशाला सामाजिक जाणीव असलेला आणि गरिबांच्या व्यथा माहीत असलेला एक कुशल अधिकारी मिळेल, याचीही मला खात्री आहे.
रवींद्र कर्वे