रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचे पोट भरणाऱ्या मजूराला दोन जणांनी बँकेत गंडा घालून त्याचे तब्बल ४५ हजार रुपये चोरुन नेले. मात्र मेहनतीची कमाई लुटली गेलेल्या मजुराने हार न मानता तब्बल महिनाभर आरोपींचा शोध घेतला आणि अखेर एका आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
रोजंदारीवर काम करणारे रामन सिद्दीकी जुलै महिन्यात भाईंदर पश्चिम येथील एका बँकेत आपल्या खात्यात ४५ हजार रुपये भरण्यासाठी गेले होते. बँकेत दोन अनोळखी व्यक्तींनी रामन यांना त्यांच्याकडील नोटा मोजून देण्यासाठी तसेच खात्यात पैसे भरण्यासाठी आवश्यक असलेली बँकेची स्लीप भरुन देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. मात्र दोन्ही अनोळखी व्यक्ती त्यांचे ४५ हजार घेऊन पळुन गेल्या. मेहनतीचे ४५ हजार रुपये अशा पद्धतीने लुटण्यात आल्याने रामन यांना धक्का बसला. मात्र त्यांनी हार न मानता आरोपींना शोधण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडली त्यादिवशी सोमवार होता, त्यामुळे बँकेत गर्दी होती. आरोपी बँकेत गर्दी असल्याची संधी साधून आपले कार्य साधत असल्याचे रामन यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दर सोमवारी बँकेत येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अखेर तब्बल एक महिन्यांनी त्यांच्या मेहनतीला यश आले.
दोन्ही आरोपींपैकी एक सूरज दुबे ऊर्फ अर्जुन हा आणखी एक सावज गाठण्यासाठी सोमवारी बँकेत दाखल झाला. रामन यांनी सूरज दिसताच त्याला पकडून ओरडायला सुरुवात केली. रामन यांची फसवणूक झाल्याची माहिती असणारे बँक कर्मचारी आणि बँकेतील इतर ग्राहक त्यांच्या मदतीला धावले.
सर्वांनी मिळुन सूरजला भाईंदर पोलीसांच्या हवाली केले. तक्रारदार रामन यांनी केलेल्या आरोपीच्या वर्णनासह बँकेतील सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिलीरुपये
.