वागळे इस्टेट परिसरातील काही भागात १५ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे काही नागरिकांचे आरोग्य बिघडले असून त्यांना कॉलरा, गस्ट्रो, कावीळ अशा आजारांची लागण झाली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे युवक काँग्रेसने महापालिकेला पत्र दिले असून यासंदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात रामचंद्रनगर, जिजामातानगर, वैतीवाडी, संभाजीनगर, लेलीननगर, साईनाथनगर, काजुवाडी, हाजुरी, आदी परिसरात नळांमधून गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. या पाण्याला घाण वासही येत आहे. यामुळे हे अशुद्ध पाणी पिण्याकरिता पात्र नाही. या गढूळ पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो आणि कावीळ असे साथीचे आजार उद्भवले असून यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे.
या भागातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे कोपरी-पाचपाखाडी विभागाचे अध्यक्ष भरत पडवळ यांनी दिली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेला पत्रव्यवहार केला असून नागरिकांचे आरोग्य सुस्थिती राहावे म्हणून दूषित पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. तसेच दूषित पाण्याचा पुरवठा त्वरित बंद करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती भरत पडवळ यांनी दिली. या संदर्भात, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.