टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही भाडेकपात नाही; प्रवाशांकडून अतिरिक्त भाडेवसुली

ठाणे : करोना टाळेबंदीच्या काळात रिक्षातून तीनऐवजी दोन प्रवाशांची वाहतूक करावी लागत असल्यामुळे चालकांनी प्रवाशी भाडय़ात वाढ केली होती. तीन प्रवाशांचे भाडे दोन प्रवाशांकडून वसूल केले जात होते. परंतु टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रिक्षातून तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास मुभा मिळाली असली तरी रिक्षाचालकांनी टाळेबंदीच्या काळात वाढविलेल्या प्रवाशी भाडय़ामध्ये अद्यापही कपात केलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालक प्रवाशांकडून दोन ते दहा रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे वसूल करून त्यांची लूटमार करत आहेत.

गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने टाळेबंदी लागू केली होती. या टाळेबंदीत रिक्षा वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रिक्षा वाहतुकीला परवानगी मिळाली. रिक्षातून तीन ऐवजी दोनच प्रवाशांची वाहतूक करण्यास राज्य शासनाने मुभा दिली होती. त्यानंतर शेअर रिक्षाचालकांनी अघोषित भाडेवाढ लागू केली होती. तीन प्रवाशांचे भाडे दोन प्रवाशांकडून आकारले जात होते. त्यामुळे प्रवाशांना दोन रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे द्यावे लागत होते.

लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक या मार्गावर पूर्वी प्रति प्रवासी २० रुपये तर, नितीन कंपनी ते ठाणे स्थानक या मार्गावर प्रति प्रवाशी १२ रुपये भाडे आकारण्यात येत होते. परंतु करोनाकाळात या मार्गावर अनुक्रमे प्रति प्रवाशी ३० रुपये आणि १५ रुपये भाडे प्रवाशांकडून आकारले जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन प्रवाशी वाहतूक करण्यास मुभा मिळाल्यानंतरही रिक्षाचालकांनी ही भाडेवाढ सुरूच ठेवली होती. ही भाडेवाढ कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. परंतु त्याकडे ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.  करोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने यंदाच्या एप्रिल महिन्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली.   यामध्ये रिक्षातून तीनऐवजी दोन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रिक्षाचालकांना भाडेवाढीचे पुन्हा कारण मिळाले. त्यांनी गेल्या वर्षभरापासून लागू केलेली अघोषित भाडेवाढ सुरूच ठेवली. राज्य शासनाने नुकतीच टाळेबंदी शिथिल केली. या शिथिलीकरणानंतर ही भाडेवाढ कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. रिक्षातून तीन प्रवाशांची वाहतूक सुरू झाली असतानाही चालक प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल करीत आहेत. या लूटमारीमुळे प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सार्वजनिक वाहनांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवाशी वाहतूक करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतेही स्वतंत्र परिपत्रक काढले जात नाही. शेअर रिक्षाचालक अजूनही जास्त भाडे आकारत असतील तर नागरिकांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे ई-मेलद्वारे किंवा पत्राद्वारे तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल.

जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

रिक्षातून पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक सुरू करावी असे परिपत्रक प्रादेशिक परिवहन विभागाकडून अद्याप आलेले नाही. त्यामुळे शहरातील अनेक रिक्षाचालक अजूनही केवळ दोन प्रवाशांची वाहतूक करत आहेत. शेअर रिक्षाचालकांना दोन प्रवाशांची वाहतूक करणे परवडत नसल्यामुळे त्यांनी भाडेवाढ केली होती. मात्र टाळेबंदी शिथिलीकरणानंतर जे रिक्षाचालक तीन किंवा चार प्रवाशांची वाहतूक करूनही जास्त भाडे आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

-विनायक सुर्वे, अध्यक्ष, एकता रिक्षा टॅक्सीचालक-मालक संघटना, ठाणे