कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहर करोनाची केंद्रे
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊ लागली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्य़ात १५०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत असताना रविवारी करोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही कल्याण-डोंबिवली आणि ठाणे या शहरांतील आहे. यामुळे ही दोन्ही शहरे करोनाची केंद्रे बनली असून येथे दररोज ६०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर जिल्ह्य़ात मृत्यूचे प्रमाणही दिवसाला सहा ते सात इतके आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाची करोनाचिंता वाढली आहे.
राज्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख खाली आली होता. दिवसाला सरासरी २५० ते ३५० करोना रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत पुन्हा झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी १ हजार ५०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, रविवारी रुग्णसंख्येने दोन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला. जिल्ह्य़ात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ लाख ६६ हजार ५५७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर १५ हजार ५०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील ४ हजार २८४ तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ४ हजार ८९४ करोना रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत ६ हजार ३८२ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सर्वाधिक ठाणे महापालिका क्षेत्रातील १ हजार ४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १ हजार २२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भिवंडीत सर्वात कमी प्रादुर्भाव
भिवंडी महापालिका क्षेत्रात सर्वात कमी करोनाबाधित रुग्ण आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी या भागात केवळ ५ ते ६ रुग्ण आढळून येत होते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानंतरही भिवंडीत दररोज सरासरी २० ते ४० रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्य़ातील इतर शहरांच्या तुलनेत येथील रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसून येते.
ठाणे शहरातील नाटय़गृहे, सभागृहांनाही निर्बंध
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील कार्यालये आणि आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यापाठोपाठ आता शहरातील नाटय़गृहे आणि सभागहांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरातील नाटय़गृहे आणि सभागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्य़ात दर महिन्यात आढळून आलेले रुग्ण
महिना रुग्ण मृत्यू
मार्च २०२० २९ ०
एप्रिल २०२० ९११ २५
मे २०२० ७३२७ २३१
जून २०२० २५०५७ ८०८
जुलै २०२० ५२६३८ १३०२
ऑगस्ट २०२० ३८२१५ ११८४
सप्टें. २०२० ५०८३५ ९०८
ऑक्टो. २०२० ३६५०७ ८८५
नोव्हें. २०२० १७४९७ २८४
डिसें. २०२० १४१६० २७१
जाने. २०२१ १०७१० २००
फेब्रु. २०२१ १०३६१ १११
१० दिवसांतील जिल्ह्य़ातील करोना रुग्णसंख्या
दिवस रुग्णसंख्या
२१ मार्च २१९५
२० मार्च १९३२
१९ मार्च १९४९
१८ मार्च १६३६
१७ मार्च १८०४
१६ मार्च १३५९
१५ मार्च ९८३
१४ मार्च ११३४
१३ मार्च ११६९
१२ मार्च ११५३
११ मार्च ९३७
शहर उपचाराधीन
ठाणे ४२८४
कल्याण-डोंबिवली ४८९४
नवी मुंबई २७९०
मीरा-भाईंदर १०९४
उल्हासनगर ६७५
शहर उपचाराधीन
भिवंडी २२३
अंबरनाथ ६०४
बदलापूर ३४२
ठाणे ग्रामीण ५९९
