सध्या १४९० उपचाराधीन रुग्ण; ‘पंचसूत्री’मुळे ग्रामीण भागातील साथ नियंत्रणात

ठाणे : जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्याने रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून जिल्ह्यात सद्य:स्थितीत १४९० उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी ठाणे शहरात सर्वाधिक म्हणजेच ५७३ रुग्ण आहेत, तर जिल्ह्यातील उर्वरित शहरी आणि ग्रामीण भागात ९१७ रुग्ण आहेत. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याने जिल्ह्यात करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ‘पाच सूत्री’मुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील करोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याचे सकारात्मक परिणाम जून महिन्यानंतर दिसू लागले. जून महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या कमी होऊ लागली. यानंतर टाळेबंदी आणि निर्बंध शिथिल होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही महिन्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून जिल्ह्यात सध्या १४९० उपचाराधीन रुग्ण आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागांतही दिवसाला ३० ते ५०च्या आसपास रुग्ण आढळून येत होते. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी चाचणी, उपचार, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि जनजागृती या पाच सूत्रीवर काम करण्यास सुरुवात केली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आले. तसेच ग्रामपंचायत स्तरावर आशा सेविका, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या साहाय्याने गाव-पाडय़ांमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत होती. पाच सूत्री कार्यक्रमामुळेच रुग्णसंख्या अटोक्यात आली असल्याचा दावा जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आला आहे. सध्या ग्रामीण भागात केवळ १४१ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक ६८ रुग्ण हे कल्याण तालुक्यातील आहेत. ग्रामपंचायत स्तरावर पाच सूत्रीचे योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

गावागावांत जनजागृती

एखाद्या गावात रुग्ण आढळून आल्यास त्या गावात तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्या गावातील नागरिकांना दवंडी पिटवून करोना नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला जात आहे. त्यासह, शिक्षकांच्या मदतीने करोनाविषयी जनजागृती करणारे चित्रफीत, लघुपट तयार करण्यात आले असून समाजमाध्यमांच्या मार्फत हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला जात आहे. तसेच जनजागृतीच्या माध्यमातून करोना लसीकरणाविषयी नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्ण

शहर            रुग्णसंख्या

ठाणे                 ५७३

कल्याण-डोंबिवली       ५३४

भिवंडी              २५

उल्हासनगर           ९५

अंबरनाथ             ७२

बदलापूर             ५०

ठाणे ग्रामीण           १४१