करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसोबत लोकप्रतिनिधीदेखील आपापल्या मतदारसंघात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. याच पार्श्वभुमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिलं आहे. राजू पाटील यांच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाची लागण झालेल्यांवर उपचार करण्यासाठी अनेक नेते, सेलिब्रेटी पुढे आले असून आपलं हॉटेल, रुग्णालय वापरण्याची परवानगी दिली आहे. कल्याण-डोंबिवलीत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना एखादं खासगी रुग्णालय उपचारासाठी ताब्यात घ्यावं असा सल्ला दिला होता. यासोबतच त्यांनी आपलं खासगी रुग्णालय ताब्यात देण्याची तयारीही दर्शवली होती. आयुक्तांनी यासाठी परवानगी दिली असून रुग्णालय ताब्यात घेण्यात आलं आहे.

राजू पाटील यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.  त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कल्याण डोंबिवलीत पहिला COVID + रूग्ण सापडल्यानंतर आयुक्तांना डोंबिवलीतील एखादा खासगी दवाखाना फक्त COVID19 साठी घ्यावा अशी सूचना केली होती. आवश्यकता वाटल्यास आमचे आरआर हॉस्पिटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. ती मान्य झाली. येथे IMA च्या डॉक्टरांचे सहाय्य घेऊन उपचार केले जातील”.

राजू पाटील यांच्या आर. आर. रुग्णालयात १५ ते २० व्हेंटिलेटर तसंच १०० बेड आहेत. राजू पाटील यांच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus mns mla raju patil handover hospital to kdmc sgy
First published on: 13-04-2020 at 10:11 IST