कल्‍याण आणि डोंबिवलीत करोनाचे तीन नवे रूग्‍ण आढळले आहेत. यासोबत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या २४ वर पोहोचली आहे. जे तीन नवे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी एक रुग्ण डोंबिवली पश्चिम येथील गरीबाचा वाडा या भागातील रहिवासी आहे. येथील ४१ वर्ष पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित दोन रुग्ण कल्याण पश्चिमेकडील चिकणघर येथे सापडले आहेत. कोरोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने त्यांनाही लागण झाली आहे. यामध्ये ६० वर्षीय महिला आणि सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा समावेश आहेत. तिन्ही रुग्‍णांना मुंबईतील कस्‍तुरबा रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

डोंबिवली शहरातील रुग्णाशी संबंधित ६० वर्षीय महिलेवर उपचार करण्यात आले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबत महापालिका क्षेत्रातील सध्‍या पुर्नतपासणी अंती डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्‍णांची संख्‍या पाच झाली आहे. सध्या कल्याण-डोंबिवली येथील एकूण १९ करोनाबाधित रूग्‍ण रूग्‍णालयात उपचार घेत आहेत.

कल्‍याण डोंबिवली महापालिकेमार्फत डोंबिवलीमधील शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, हे विलगीकरण रूग्‍णालय म्‍हणून घोषित केले असून महापालिका क्षेत्रातील संशयित रूग्‍णांना तेथे दाखल करून घेण्‍यात येणार आहे.

महापालिकेकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीकरता बाई रूक्‍मीणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील ०२५१-२३१०७०० व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील ०२५१-२४८१०७३ व ०२५१-२४९५३३८ या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा असंही आवाहन वैद्यकीय आरोग्‍य अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.