घरातल्या घरात काम करून कुटुंबाला हातभार लावण्यात गृहिणींना उपयुक्त ठरणाऱ्या शिलाई यंत्रांनी अंबरनाथ येथील दोन जुळ्या वस्त्रोद्योग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये शेकडो महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. डिफाईन्स निटिंग इंडस्ट्रिज प्रा. लि. आणि डी.के. अ‍ॅप्रेरल प्रा. लि. या अंबरनाथ आनंदनगरमधील दोन कंपन्यांमध्ये कार्यरत १६०० कामगारांपैकी बाराशेहून अधिक महिला कामगार आहेत. एक तपाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या दोन कंपन्यांनी अगदी सुरुवातीपासूनच महिलांना प्राधान्य देण्याचे धोरण यशस्वीपणे राबविले आहे. लवकरच कंपनीचे विस्तारीकरण होणार असून त्यानंतर आणखी दोन हजार महिलांना आम्ही रोजगार देऊ, अशी माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक अनिल परब यांनी दिली.
 या दोन कंपन्या प्रामुख्याने अमेरिकास्थित ‘फ्रुट ऑफ द लूम’ आणि ‘जॉकी’ या दोन आंतरराष्ट्रीय बॅन्डसाठी काम करतात. या कंपन्यांतर्फे जगभर वितरित होणारी अंर्तवस्त्रे आणि टी.शर्टस् निर्मिती अंबरनाथमध्ये केली जाते. या दोन्ही कंपन्यांचे वैशिष्टय़ म्हणजे येथे महिलांना आधी शिलाईकामाचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी कंपनीचा स्वतंत्र विभाग आहे. तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांना प्रत्यक्ष काम दिले जाते. प्रशिक्षण कालावधीचेही त्यांना विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जाते. पूर्वी कंपनीत नोकरीसाठी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण असणे अनिर्वाय होते. आता ही अट शिथिल करून पाचवी शिकलेल्या महिलांनाही नोकरी दिली जाते.  सकाळ आठ ते पाच आणि पावणेनऊ ते पावणे सहा अशा दोन शिफ्टमध्ये कंपनीचे कामकाज चालते. कामगार कायद्यानुसार देय असणाऱ्या सर्व सुविधा येथे दिल्या जातात. साप्ताहिक रजेव्यतिरिक्त एकही सुट्टी न घेणाऱ्याला दरमहा सातशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कंपनीत एक दवाखाना आहे. याशिवाय वेळोवेळी आरोग्य शिबिरे भरवून कामगारांची वैद्यकीय तपासणी केली जाते, अशी माहिती कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जयकुमार यांनी  दिली.  
प्रशांत मोरे, ठाणे