ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी ३ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी सात दिवसांनी वाढली आहे.
ठाण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे ठाणे पालिका सभागृहातही तीव्र पडसाद उमटले होते.या आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी नगरसेवक हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि नजीब मुल्ला या चौघांना अटक केली होती. या चौघांना ठाणे न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून चौघेही ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहेत. न्यायालयाकडून त्यांच्या कोठडीत सातत्याने १४ दिवसांची वाढ करण्यात येत होती. यावेळी मात्र त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.