ठाणे आयुक्तांविरोधात नगरसेवकांची नाराजी
ठाणे शहरातील सहा रस्त्यांना मॉडेल रोडचा दर्जा देत त्यांच्या विकासासाठी सुमारे ६६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करणाऱ्या महापालिका प्रशासनावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवली. शहरात यापूर्वी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. असे असताना ही मॉडेल रोडची नवी टूम कुणी काढली, असा सवाल करत काही नगरसेवकांनी या मुद्दय़ावर थेट आयुक्त संजीव जयस्वाल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
ठाणे शहरातील सहा रस्त्यांना विशेष दर्जा देत त्यांच्या विकासासाठी ६६ कोटी रुपयांचे पॅकेज आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास थेट विरोध करणे सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरील नगरसेवकांनी टाळले असले तरी दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे अपूर्ण असताना मॉडेल रोडसाठी एवढा खर्च कशासाठी, असा सवाल काहींनी उपस्थित केला. अनेक प्रभागांमध्ये पाच ते दहा वर्षांपासून रस्त्यांची कामे झालेली नाहीत. अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. तेथील वाहतुकीचा प्रश्न गहन बनला आहे. असे असताना मॉडेल रोडवर कोटय़वधी खर्च करायचे आणि अंतर्गत रस्त्यांकडे ढुंकूनही बघायचे नाही हे धोरण योग्य नाही, असा सूरही काही नगरसेवकांनी या वेळी लावला.
रस्त्याचा विकास करताना प्रशासनाकडून ठरावीक रस्त्यांची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे आधी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात अपूर्ण राहिलेल्या रस्त्याची कामे पूर्ण करा मगच इतर रस्ते मॉडेल करा असा सूर सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावला. काँक्रिटीकरण करण्याच्या रस्त्यांच्या यादीत मनोरुग्णालयालगत असलेला रस्ता का घेण्यात आला नाही, असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. गेली आठ वर्षे पाठपुरावा करूनही आपल्या प्रभागामधील रस्त्यांची कामे झाली नसल्याची टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या प्रस्तावातील रस्त्यांवरच आक्षेप घेतला. तसेच जे रस्ते मुळात चांगले आहेत, त्याच रस्त्यांवर पुन्हा खर्च कशासाठी, असा सवाल उपस्थित केला.