महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिले नसतानाही रहिवाशांना घरांचा ताबा देऊन मोकळे झालेले ठाण्यातील कॉन्कोर्ड डेव्हलपर्स यांच्या शिवाईनगर परिसरातील ‘कॉसमॉस हॉरिझॉन’ या आलिशान गृहप्रकल्पापुढील अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेच्या माध्यमातून अडीच चटईक्षेत्र निर्देशांक पदरी पाडून घेण्यासाठी उभारण्यात आलेला टोलेजंग इमारतीच्या या प्रकल्पाला नगरविकास विभागाच्या आदेशानुसार भोगवटा प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचे प्रमुख प्रदीप गोहिल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. त्यामुळे या ठिकाणी कोटय़वधींची घरे खरेदी करणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
कॉसमॉस हॉरिझॉन वसाहतीतील घरांना अधिकृत पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या मुद्दय़ावरून स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी हा विषय मांडला. त्यावर बोलताना गोहिल यांनी भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने पाणीपुरवठय़ाची जोडणी देता येणार नाही, असे म्हटले. हे बांधकाम म्हाडाच्या योजनेत बसत नसले तरी राज्य सरकारने आखलेल्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेत बसवावे, अशा स्वरूपाची विनंती संबंधित विकासकाने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी दाखल केलेल्या विनंतीअर्जात केली होती. मात्र, नव्या योजनेच्या निकषांतही हे बांधकाम बसत नाही, अशी माहिती महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे, असेही गोहिल यांनी या वेळी स्पष्ट केले.

प्रकरण काय?
* वाढीव चटईक्षेत्राच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या घरांपैकी २५ टक्के घरे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाला उपलब्ध करून देण्यात यावीत, असे मूळ धोरण होते.
* या धोरणाच्या माध्यमातून सूरज परमार या ठाण्यातील बिल्डर संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या विकासकाच्या कंपनीने शिवाईनगर परिसरात ‘कॉसमॉस हॉरिझॉन’ ही टोलेजंग इमारत उभारली आहे.
* मात्र ही योजना खासगी नव्हे तर म्हाडाच्या जमिनीवर उभी राहावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याने या इमारतीचा वाद सध्या न्यायालयात गेला आहे. त्यामुळे संकुलाला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही.
* भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही घरांचा ताबा दिल्याप्रकरणी महापालिकेने बिल्डरला एमआरटीपी कायद्याअंतर्गत नोटीस बजावली आहे.
* बिल्डर सूरज परमार यांनी मात्र, आम्ही म्हाडाच्या धोरणानुसार बांधकाम केल्याचा दावा केला आहे.