विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडन येथे पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या याला विशेष न्यायालयाने मंगळवारी अखेर ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित केले.

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटसह बरीच अटक वॉरंट्स बजावण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्याला ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या आठवडय़ात विशेष न्यायालयाकडे केली होती. अतिरिक्त न्यायाधीश पी. के. भावके यांनी ‘ईडी’ची ही मागणी मान्य करत मल्या याला फरारी आरोपी म्हणून घोषित केले.

मल्याविरोधात बरीच अटक वॉरंट्स विविध न्यायालयांनी बजावलेली आहेत. त्यामध्ये धनादेश न वटण्याच्या प्रकरणासोबत आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांचा समावेश आहे. मल्याने केलेल्या घोटाळ्यांबाबत सुरू असलेल्या प्रकरणांच्या तपासाची सद्य:स्थिती समजावून सांगताना त्याच्याविरोधातील सगळ्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी आवश्यक असल्याचेही ‘ईडी’ने आपल्या अर्जात म्हटले होते.  ज्या ठिकाणी अटक वॉरंटची कारवाई करता येऊ शकत नाही, अशा ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीला फरारी आरोपी म्हणून घोषित केले जाते. फौजदारी दंडसंहितेच्या कलम ८२ नुसार  संबंधित आरोपीला फरारी घोषित केले जाते.