खाडीच्या पाण्याचा प्रक्रियाखर्च फार!

खाडीच्या पाण्याचे विक्षारण करण्यासाठी संबंधित ठेकेदारास मोठा खर्च येईल.

महापालिकेच्या तिजोरीवर विक्षारणाचा भार

ठाणे शहरासाठी पाण्याचा स्वतंत्र स्रोत तयार करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने आता अत्यंत प्रदूषित असा शिक्का बसलेल्या ठाणे खाडीतील पाण्याचे शुद्धीकरण करून ठाणेकरांची तहान भागवण्याचा प्रयत्न चालवला आहे. खाडीतील पाण्याचे विक्षारण करून ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी ठाणे खाडी परिसरात २० दशलक्ष लिटर क्षमतेचा भला मोठा प्रकल्प लोकसहभागातून उभारण्यात येणार असून त्यातून मिळणारे शुद्ध पाणी ६३ रुपये प्रति हजार लिटर या दराने पालिका खरेदी करणार आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून नऊ रुपये तर स्टेम प्राधिकरणाकडून १० रुपये ५० पैसे या दराने पाणी विकत घेऊन महापालिका ते ठाणेकरांना पुरवत असते. असे असताना प्रदूषित खाडीचे विक्षारण केलेले पाणी तब्बल ६३ रुपये दराने खरेदी करण्याचा हा प्रस्ताव काहीसा वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

महापालिकेने आखलेल्या या प्रस्तावानुसार विक्षारण केलेल्या पाण्यापैकी तब्बल ८० टक्के पाण्याची खरेदी करणे महापालिकेस बंधनकारक करण्यात आले आहे. हे पाणी इतर प्राधिकरणांपेक्षा खूपच महाग असेल हे स्पष्ट असतानाही पालिकेने ते खरेदी करण्याचे बंधन या कराराद्वारे स्वत:वर लादून घेतले आहे. खाडीच्या पाण्याचे विक्षारण करण्यासाठी संबंधित ठेकेदारास मोठा खर्च येईल. त्यामुळे प्रकल्प उभा राहताच त्याला ग्राहक मिळणे गरजेचे आहे, असे कारण यासाठी महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी देत असले तरी २० दशलक्ष लिटरपैकी तब्बल ८० टक्के पाण्याच्या खरेदीसाठी महापालिकेच्या तिजोरीवर मोठा भार पडण्याची शक्यता आतापासून व्यक्त केली जात आहे. उर्वरीत २० टक्के पाण्यावर ठाणे महापालिकेचा हक्क अबाधित राहील आणि महापालिकेच्या मान्यतेने हे पाणी किंवा त्याचा काही भाग ठेकेदार खुल्या बाजारात विकू शकणार आहे.

खाडीचे पाणी पिण्यासाठी

ठाणे महापालिका सद्य:स्थितीत एमआयडीसी, स्टेम आणि स्वत:च्या पाणी स्रोतातून दररोज ४५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या भागात पुरवठा करत असते. ठाणे महापालिकेच्या मालिकेचे धरण असावे अशा स्वरूपाची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र यासाठी आग्रहाने पाठपुरावा करण्यास अपयशी ठरलेल्या महापालिकेने थेट खाडीच्या पाण्यावर विक्षारण प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या यशाविषयी महापालिका वर्तुळात कमालीचा संभ्रम असताना आयुक्त संजीव जयस्वाल मात्र त्यासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. खाडीच्या पाण्याचे विक्षारण केल्यास पाणीपुरवठय़ाचा नवा स्रोत उभा राहू शकेल असा आयुक्तांचा दावा असला तरी अत्यंत प्रदूषित म्हणून गणल्या जाणाऱ्या ठाणे खाडीचे पाणी पिण्यासाठी स्वीकारण्यास ठाणेकर रहिवाशी तयार होतील का, असा सवाल महापालिका वर्तुळात दबक्या सुरात उपस्थित केला जात आहे. यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदा प्रक्रियेनंतर मेसर्स फॉण्टस वॉटर प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स डिसालिया वॉटर एस.एल. या दोन कंपन्यांना संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प उभा करण्यास परवानगी देणारा प्रस्ताव जयस्वाल यांनी यंदाच्या सर्वसाधारण सभेत मांडला आहे. या निविदानुसार सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी १००० लिटर पाण्यासाठी ६३ रुपये इतक्या दर महापालिकेस ठेकेदारास मोजावे लागणार आहेत. त्यानंतर चवथ्या वर्षांपासून होलसेल प्राइस इंडेक्टर (४५ टक्के) आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (५५ टक्के) या प्रमाणात पाण्याचे दर ठरणार आहे. हे दर सद्य:स्थितीतील दरापेक्षा कमी असू शकतील असा दावा प्रशासन करत असले तरी याविषयी प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रकल्प उभा करणे आणि कार्यान्वित करताना होणाऱ्या विजेचे देयक महापालिका अदा करणार आहे. हे पाणी खरेदी करणे महापालिकेवर बंधनकारक ठरणार असल्याने तिजोरीवर मोठा भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Creek water treatment expenses