महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी पाच महिन्यांपूर्वी पालिका मुख्यालय इमारतीत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या १७ नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला असला तरी सत्ताधारी शिवसेनेनेच ही खेळी खेळून भाजपला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर आक्षेप घेत भाजप नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकत्र्यांनी पालिकेतील डुम्बरे यांच्या कार्यालयात शिरून त्यांना घेराव घालून जाब विचारला होता. याप्रकरणी भाजपने केलेल्या मागणीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकत्र्यांवर गुन्हा दाखल केला होता. करोना नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर आता पालिकेचे सुरक्षारक्षक सूर्यकांत पौळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी आता भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान या नगरसेवकांनी सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनामुळे करोना नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.

ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर भाजप गटनेते मनोहर डुम्बरे यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी डुम्बरे यांना नोटीस बजावून १५ दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

गुन्हा कुणावर? – भाजपचे गटनेते मनोहर डुम्बरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, आशा शेरबहादूर सिंग, नारायण पवार, नंदा पाटील, स्नेहा आंब्रे, दीपा गावंड आणि अशोक राऊळ यांचा समावेश आहे.