पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरारी
विरार : नायगाव पूर्वेतील मुथूट फायनान्स या कंपनीच्या शाखेवर तीन जण दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिजोरी उघडताना वाजलेल्या सुरक्षा घंटी (सिक्युरिटी अलार्म) वाजल्याने स्थानिक सतर्क झाले आणि त्यांनी वालीव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन आरोपींना अटक केली, तर एक जण फरारी झाला.
जुचंद्र येथील मुथूट फायनान्स कंपनीत तीन चोरटय़ांनी चोरीचा डाव आखला होता. बुधवारी मध्यरात्री चोरटे कंपनीच्या इमारतीच्या मागच्या बाजूस जाऊन भिंतीला भगदाड पाडून त्यांनी या कंपनीच्या शाखेत प्रवेश केला. त्यांनतर आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीची तिजोरी फोडण्यास सुरुवात केली. यावेळी तिजोरीला लावलेला अलार्म वाजला आणि त्या आवाजाने स्थानिक रहिवाशी सतर्क झाले. काहीतरी चुकीचे घडत असल्याचा अंदाज घेत त्यांनी वालीव पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे कळताच या चोरांनी त्यांच्यावर दगड व विटांचा हल्ला केला. या हल्लय़ात दोन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी यावेळी दोघा चोरांना अटक केली तर एका आरोपीने पोबारा केला होता.
जखमी पोलिसांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आरोपींकडून गॅस कटर, हातोडी, फावडा, कुदळ आदी चोरीसाठी वापरण्यात आलेले सामान जप्त केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीच्या या शाखेच्या तिजोरीत तीन कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले होते, तरीही येथे एकही सुरक्षा रक्षक नेमण्यात आला नसल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.