कल्याण : कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर भाजी विक्री करण्यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांना विनाशुल्क मैदान उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी दोन खासगी व्यक्ती आणि पालिकेचे दोन कर्मचारी भाजी व्यापाऱ्यांकडून जागेच्या बदल्यात भाजी ट्रक मैदानात घेण्यासाठी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे आल्याने चौघांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पालिका कर्मचारी किशोर खुताडे, मोहन केणे आणि दोन खासगी दलाल प्रशांत माळी, किशोर पटेल हे फडके मैदानावर भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्यांकडून खंडणी वसूल करीत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे नावानिशी करण्यात आल्या होत्या. या नावांची खात्री पटल्यानंतर आयुक्तांनी खासगी व्यक्तींवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. सध्या आणीबाणीची परिस्थिती असताना प्रत्येकाने अतिशय संयम आणि सावधगिरीने वागणे आवश्यक असताना काही बेशिस्त कर्मचारी अनागोंदीची परिस्थिती निर्माण करीत असल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केणे, खुताडे या पालिका कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून फडके मैदानावर व्यापार करणाऱ्यांकडून पालिका कर्मचाऱ्यांसह काही खासगी मंडळी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ नगरसेवक सचिन बासरे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. अधिक माहितीसाठी प्रशांत माळी यांच्याशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.