अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे; आठवडाभरात दोघांवर कारवाई

शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी केली जात असल्याचे समोर आले आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

उल्हासनगर : शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेने दिलेल्या तक्रारीनंतर गेल्या आठवडाभरात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर शहरातील बहुतांश शासकीय जागांवर अतिक्रमण झाल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले होते. त्यामुळे शासनाचे भूखंड पालिकेच्या नावावर करण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्या काही काळात सातत्यपूर्ण प्रयत्न केले असून त्यात यशही येताना दिसते आहे. मात्र त्याचवेळी शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची हिंमतही वाढली आहे.
शहरात गेल्या तीन दशकांत विविध बांधकामे उभारली गेली. त्या १९९० ते १९९७ या काळात उभारण्यात आलेल्या अनेक इमारतींमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेल्याची कुजबुज होती. अशा अनधिकृत आणि कमकुवत इमारतींवर तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने स्लॅब तोडून कारवाई केली. मात्र पुन्हा दुरुस्ती करून या इमारती वापरात आणल्या गेल्या. त्यांचेच आता अपघात होत आहेत.
पालिका यावर सातत्याने कारवाई करत असते. त्यानंतरही अनधिकृत बांधकामे उभीच राहात असल्याचे दिसते आहे. नुकतेच पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या दोघांविरुद्ध एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात दसरा मैदानाच्या जवळच्या इंदिरा गांधी बाजारपेठेजवळ असलेल्या हरेश तलरेजा यांच्याविरुद्ध १२ मे रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तर कॅम्प एक भागात अमन टॉकीज भागात राहणाऱ्या कैलास थारवानी यांच्यावर १८ मे रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभाग समिती अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crimes against unauthorized builders action both week amy

Next Story
जिल्ह्याच्या शहरी भागांवर पूर्णत: प्रशासकीय राजवट ; इतर पालिकांपाठोपाठ भिवंडी पालिकेवरही लवकरच प्रशासक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी