बारा बंगला, कोपरी
गर्द हिरवळीने नटलेला परिसर, रंगीबेरंगी फुलांनी फुललेली वृक्षराजी, उद्यानाच्या आजूबाजूला गवताची हिरवळ, नागमोडय़ा वळणाचे रस्ते, जॉगिंग ट्रॅक, खेळण्यासाठी मैदान आणि खुली व्यायामशाळासाठी मोहक व्यवस्था कोपरीच्या बारा बंगला परिसरात करण्यात आलेली आहे. अत्यंत शिस्तबद्ध वातावरण असलेल्या या ठिकाणी वर्षांच्या बाराही महिने नागरिकांना व्यायामाचा आनंद घेता येतो. त्यामुळे व्यायामोत्सुक ठाणेकरांसाठी हे व्यायामाचे सदाहरित ठिकाण बनले आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये संगीताचा आस्वाद घेत नागरिक मोठय़ा संख्येने व्यायामासाठी हजेरी लावत. एकदा या ठिकाणाला भेट दिल्यानंतर प्रत्येक वेळेला पुन:पुन्हा यावे असे इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटत जाते.
उन्हाची काहिली वाढू लागल्यानंतर व्यायाम करणाऱ्या नागरिकांचा उत्साहही हळूहळू कमी होऊ लागतो आणि हिवाळ्यात सुरू केलेला व्यायामाचा ओघ आपोआप ओसरू लागतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये मोठय़ा उत्साहाने गजबजलेल्या मॉर्निग स्पॉटवरील गर्दी विरळ होऊ लागली आहे. असे असले तरी शहरातील अशी काही ठिकाणे असतात ज्या ठिकाणी वर्षांच्या कोणत्याही दिवशी गेलो तरी तेथे व्यायाम करणाऱ्यांचा उत्साह कमी झालेला नसतो. उलट अशा ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढतच असते. या ठिकाणांमध्ये ठाण्यातील बारा बंगला परिसराचा उल्लेख करावा लागेल, कारण मे महिन्याच्या उन्हाच्या झळा जाणवू लागलेल्या असतानाही सकाळच्या वेळेत येथे येणाऱ्या नागरिकांची गर्दी मात्र कमी झालेली नाही. विशेष म्हणजे केवळ ज्येष्ठ नागरिकांचाच नव्हे, तर तरुण आणि लहान मुलांचाही राबता इथे आढळून येत आहे. त्यामुळे व्यायामोत्सुक ठाणेकरांमध्ये या ठिकाणाविषयीची असलेली आवड लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
कोपरी बारा बंगला परिसर सकाळी चालण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण असून दिवसाच्या कोणत्याही प्रहरी या भागात दाट सावली असते. त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी इथे नागरिकांना व्यायामासाठी जाता येते. सकाळ आणि संध्याकाळी इथे मोठी गर्दी असते. येथे येणाऱ्या मंडळींमध्ये बहुसंख्य मंडळी ही पोलीस दलात तसेच प्रशासकीय सेवेमध्ये असल्याने त्यांच्या दृष्टीने इथे व्यायाम करणे महत्त्वाचे ठरते. महापालिकेच्या वतीने या भागाची देखभाल दुरुस्ती केली जात असून इथली वृक्षराजी चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. या भागात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, पदपथ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पावसाळ्यात व्यायामासाठी छोटय़ा राहुटय़ा आणि खुली व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच मराठी भक्तिसंगीत आणि भावगीतांची गाणी इथे वाजवली जातात. त्यामुळे नागरिकांचे पुरते मनोरंजन होते.

कोपरी बारा बंगलाची वैशिष्टय़े..
* कोपरी बारा बंगला येथे सुमारे ६५० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक आहे.
* शिवाय ३१० मीटर लांबीचे परिसरातील पदपथ नागरिकांसाठी चालण्यासाठी उपलब्ध आहेत.
* नौपाडा आणि कोपरी परिसरांतील शेकडो रहिवासी दररोज सकाळ-सायंकाळ या ठिकाणी फेरफटका मारण्यास येतात.

In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

अनुभवाचे बोल..
भल्या मोठय़ा घडय़ाळाची व्यवस्था करावी..
महापालिकेने या परिसरात चांगल्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये हिरवळ, संगीत ऐकण्याची व्यवस्था आणि व्यायामशाळा यांचा समावेश आहे. या भागात येणारी अनेक मंडळी कोणत्याही प्रकारची यांत्रिक उपकरणे स्वत:सोबत आणत नाहीत. त्यामुळे या भागात मोठय़ा घडय़ाळाची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे एक देखणे शिल्प इथे उपलब्ध होईल, शिवाय नागरिकांना वेळसुद्धा समजू शकेल. शिवाय पिण्याच्या चांगल्या पाण्याची व्यवस्था इथे असावी. सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्यायोग्य नसते. – रिचर्ड डिसूझा

खुल्या व्यायामशाळेची देखभाल दुरुस्ती करा
ठाणे महापालिकेतर्फे कोपरीच्या बारा बंगला परिसरात खुली व्यायामशाळा सुरू करण्यात आली असून नागरिकांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. मात्र व्यायामाची हे साहित्य आता तुटू लागले आहे. त्यामुळे महापालिकेने ही दुरुस्त करावी. आवश्यक ठिकाणी नवे साहित्य जोडण्यात यावे. याशिवाय आणखी एक खुली व्यायामशाळा या भागात उभी केल्यास त्याचा चांगला लाभ परिसरातील नागरिकांना घेता येऊ शकतो. ही व्यायामशाळा एकदा बसवल्यानंतर त्याची कोणत्याही प्रकारे देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. – शीतल तांबे

स्वच्छता राखण्यात यावी..
बारा बंगला हा परिसर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याचे ठिकाण असल्याने तेथे बऱ्यापैकी स्वच्छता असते. या भागात काही ठिकाणी आणि कोपऱ्यामध्ये कचरा टाकण्याचा प्रकार होत असल्याने काहीशी अस्वच्छता निर्माण होते. ही अस्वच्छता दूर करण्यात यावी. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही या भागात येत असून हा परिसर आम्हाला आवडतो. – भावना शिंदे

लोकांनी पुढाकार घेण्याची गरज
महापालिकेच्या वतीने खुली व्यायामशाळा सुरू करण्यात आली असून त्याचा नागरिक चांगला वापर करून घेत आहेत. या भागात चांगले रस्ते उपलब्ध असून त्यावरून नागरिक व्यायाम करत आहेत. मात्र केवळ पालिका प्रशासनावर यासाठी अवलंबून राहण्याची गरज नाही. लोकांनी पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ राहील तसेच साहित्याची मोडतोड होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
अश्विन कोळी

खेळाच्या मैदानावर हिरवळ हवी
बारा बंगलालगत ठाणे जिमखान्याचे क्रिकेट मैदान असून या भागात अनेक ठिकाणाहून मुले क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. क्रिकेटचे खेळ असूनही या मुलांना लाल मातीमध्ये खेळ खेळावा लागतो. महापलिका प्रशासनाने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरात हिरवळ उपलब्ध करून दिल्यास मुलांचा नेट सराव चांगला होऊ शकेल.
– रणजित देशमुख