ठाण्यातील नाटय़गृहांत सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमच जास्त; चार नाटय़ागृहांमध्ये दोन महिन्यांत ६३ प्रयोग

एकेकाळी मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या नाटकांच्या प्रयोगांना कमालीची ओहोटी लागल्याचे दिसून येत असून ठाणे जिल्ह्य़ातील चार नाटय़गृहांमध्ये गेल्या दोन महिन्यांत सादर झालेल्या १४५ कार्यक्रमांपैकी फक्त नाटय़प्रयोगांची संख्या फक्त ६३ आहे. उर्वरित ८२ कार्यक्रमांत गाण्यांच्या मैफली, शाळांचे स्नेहसंमेलन, राजकीय पक्षांचे कार्यक्रम आदींचा समावेश होता. गेली काही वर्षे शनिवार-रविवारचा अपवाद वगळता नाटय़गृहांमधील कार्यक्रमांकडे प्रेक्षक फारसे फिरकत नसल्याचे दिसून आले आहे. या दुष्काळी परिस्थितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या निश्चलनीकरणाची ‘तेरावा महिना’ म्हणून भर पडली आहे.

तलावपाळीकाठचे गडकरी रंगायतन हे ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे. येथील नाटय़प्रयोगांना दर्दी रसिकांचा प्रतिसाद तुलनेने अधिक मिळतो, असा रंगकर्मीचा अनुभव आहे. मात्र गेली काही वर्षे येथील रसिकांची संख्याही रोडावली आहे. गडकरीमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेल्या ७७ कार्यक्रमांमध्ये ३३ नाटय़प्रयोग होते. इतर तीन नाटय़गृहांपेक्षा गडकरीची स्थिती काहीशी बरी म्हणता येईल, अशी आहे. फक्त शनिवार-रविवारी प्रयोग होत असल्याने नाटय़गृहांचे उत्पन्नही रोडावले असून त्यातून नाटय़गृहांची देखभाल दुरुस्तीही होत नाही. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह तर गेली आठ महिने डागडुजीसाठी बंदच आहे.

राजकीय दबावामुळेही अनेक प्रयोग रद्द करावे लागत असल्याचेही निर्माते व कलाकरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेही अचानक रद्द होणाऱ्या प्रयोगांची संख्याही वाढत आहे. इतकेच नव्हे तर राजकीय पक्षांसाठी किंवा सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमासाठी नाटकाची रंगीत तालीमही रद्द केली जाते. गेल्या महिन्यात ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे एकूण ७७ कार्यक्रम पार पडले.

कल्याण येथील आचार्य अत्रे नाटय़गृहात नोव्हेंबर महिन्यात ३३ कार्यक्रम पार पडले, यातील १७ प्रयोग नाटकाचे असल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर महिन्यातही अशीच परिस्थिती होती. २६ डिंसेबपर्यंत येथे ४७ कार्यक्रम पार पडले. मात्र त्यात नाटय़प्रयोग अवघे सात होते.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एकूण ३५ कार्यक्रमांपैकी अवघे सात नाटय़प्रयोग होते. उर्वरित २८ कार्यक्रमांमध्ये शाळांची स्नेहसंमेलने तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांचा समावेश होता.

नोटाबंदीमुळे नाटय़ व्यवसाय अडचणीत आला. त्यात मोक्याच्या तारखा राजकीय पक्षांनी मेळाव्यानिमित्त घेतल्याने परिस्थिती बिकट झाली. खरेतर अशा प्रकारच्या सांस्कृतिक मेळाव्यांसाठी नाटय़गृहांचा वापर केला जाऊ नये. त्यासाठी स्वतंत्र सभागृहे असावीत. त्यामुळे तारखांचा घोळ होणार नाही. 

-राहुल भंडारी, निर्माता

नाटय़प्रयोग अधिक होत नाहीत. त्यामुळे पालिकेने बांधलेली ही नाटय़गृहे तशीच पडून रहतात. शिवाय शनिवार- रविवार नाटकांचे प्रयोग असतात. रविवारी दुपारच्या प्रयोगासाठी सर्वच निर्मात्यांची गर्दी झालेली असते. संस्थाच्या कार्यक्रमामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. सावित्रीबाई फुले नाटय़गृह शहरापासून दुर असल्याने येथे फारसे रात्रीचे प्रयोग होत नाहीत.

-दत्तात्रय लधवा, सावित्रीबाई फुले नाटय़गृह, व्यवस्थापक