आचार्य अत्रे कट्टय़ावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

रस्त्यावरील भटके आयुष्य जगणाऱ्या मुलांना उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखविणाऱ्या ठाण्यातील तीनहात नाका येथील सिग्नल शाळेने येत्या बाल दिनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला आहे. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ आणि ‘आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ’ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात १६ नोव्हेंबर रोजी कट्टय़ावर ही मुले विविध कला सादर करतील. या मुलांसाठी काम करणाऱ्या ‘समर्थ भारत व्यासपीठा’चे भटू सावंत, आरती नेमाणे आणि आरती परब हे कार्यकर्ते अनुभव कथन करणार आहेत.

ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलजवळ उड्डाणपुलाखाली भरणाऱ्या सिग्नल शाळेतील विद्यार्थी गेला आठवडाभर नृत्य, नाटुकलीच्या तयारीत रमले आहेत. या कार्यक्रमामध्ये २२ मुलांनी भाग घेतला असून त्यांना नृत्यासाठी शीला वागळे, तर नाटकासाठी दिग्दर्शक अभिजित पानसे मार्गदर्शन करीत आहेत. पानसे यांनी लिहिलेल्या ‘माझी सिग्नल शाळा’ या गाण्याचे सादरीकरणही या कार्यक्रमात होणार आहे. मुलांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेने ठाणे महानगर पालिकेच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये ही शाळा सुरूकेली आहे. हक्काची जागा नसणाऱ्या मुलांना आता आपले कपडे व इतर वस्तू ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकरही येथे उपलब्ध आहेत. पूर्वी ही मुले पदपथाच्या कडेला भरधाव वाहनांच्या दहशतीखाली चिरगुटात झोपत होती. आता शाळेसमोरच्या काँक्रीटच्या पट्टय़ावर नवी कोरी सतरंजी अंथरून झोपतात.

सिग्नलवर भीक मागणाऱ्या, फुले विकणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षणाच्या जोडीनेच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. कला सादरीकरण हा त्याचाच एक भाग आहे, अशी माहिती ‘समर्थ भारत व्यासपीठ’चे भटू सावंत यांनी दिली.