ठाणे : तुमच्या बँक खात्याचा गैरवापर करुन त्या खात्याद्वारे सायबर गुन्ह्यातील पैसे वळते होत नाही ना? कारण असाच प्रकार भिवंडी शहरात नुकताच उघड झाला आहे. भिवंडी येथे सरकारी, खासगी बँकांमध्ये बँक खाते तयार करुन त्या खात्यांमध्ये फसवणूक करण्यात आलेल्या नागरिकांचे पैसे वळवून घेत असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. याप्रकरणी भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी गोवा येथे जाऊन सात सायबर गुन्हेगारांना अटक केली. यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भिवंडीतील शेकडो नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक झाली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.आनंद मेघवानी (वय-३४, मध्यप्रदेश), भोला यादव (वय-२१, बिहार), लालचंद मुखीया (वय-२५, बिहार), गौरव यादव (वय-२५, बिहार), रोहीतकुमार यादव (वय- २१, बिहार), राजाकुमार यादव (वय- २१, बिहार), सौरभ शर्मा (वय-४०, छत्तीसगड) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ३० मोबाईल, लॅपटाॅप, बँक खात्यांच्या पुस्तिका, डेबिट कार्ड, मोबाईल सीमकार्ड जप्त केले आहेत.

भिवंडी येथे राहणाऱ्या एका तरुणाकडे काहीजण आले होते. त्याला नोकरीचे अमीष दाखवून एका सरकारी बँकेत खाते उघडण्यास सांगितले. त्या तरुणाने खाते उघडल्यानंतर त्याच्या बँक खात्याची सर्व माहिती, इतर कागदपत्र त्या व्यक्तींनी घेतले. नोकरीच्या आशेवर तरुण होता. त्याने काही दिवसांनी बँक खाते तपासले असता, ते गोठविण्यात आल्याचे समोर आले. त्याने तात्काळ याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी माहिती घेतली असता, त्याच्या बँक खात्यात सायबर फसवणूकीचे पैसे वर्ग झाल्याने ते गोठविण्यात आल्याचे उघड झाले.

याप्रकरणाचा तांत्रिक तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुचेकर, पोलीस काॅन्स्टेबल दीपक सानप, रोहीत इंगळे यांनी या प्रकरणाची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेतली असता, या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपी हे गोवा येथील वास्को भागात असल्याचे समोर आले. त्यानंतर शांतीनगर पोलिसांच्या पथकाने वास्को येथे जाऊन एका हाॅटेलमध्ये छापा टाकला. यात पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन अटक केली.

अशी होते फसवणूक

– ही टोळी एखाद्या बेरोजगार किंवा गरीब व्यक्तीला हेरून त्याला अमीष दाखवित बँक खाते उघडण्यास सांगतात. त्या बँक खात्याची सर्व माहिती हे सायबर गुन्हे गार त्या व्यक्तीकडून घेतात. त्यानंतर सायबर गुन्ह्यातील पैसे त्या खात्यात वळवून घेत असे. त्यानंतर त्या बँक खात्यातील पैसे विविध माध्यमातून काढून घेत. एखाद्या वेळेस पोलिसांनी कारवाई केली तरी सायबर गुन्ह्यातील पैसे ज्या खात्यात वळते झाले त्या खातेदाराचीच चौकशी होईल आणि सायबर गुन्हेगार मोकाट असतील अशी या मागची योजना असते.

या प्रकरणात आणखी कारवाई आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यादिशेने तपास सुरु आहे, ही कारवाई भिवंडी परिमंडळाचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, अतुल अडुरकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन कुचेकर, पोलीस हवालदार शिरोसे, पोलीस काॅन्स्टेबल दीपक सानप, कुशल जाधव, रोहीत इंगळे, गडाख यांच्या पथकाने केली.