फलाटावरील गर्दी टाळण्यासाठी बदलापूरकरांच्या उलट दिशेने उडय़ा; अतिरिक्त जिने उभारण्याची गरज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर रेल्वे स्थानकातील कोंडी दिवसेंदिवस वाढत असताना गर्दी टाळण्यासाठी अनेकदा प्रवासी चोरवाटांचा जीवघेणा पर्याय निवडू लागले आहेत. त्यात पहाटेच्या वेळी कर्जतकडून येणारे आणि बदलापूरला उतरणारे प्रवासी फलाटावरील गर्दी टाळण्यासाठी फलाटाच्या विरुद्ध दिशेला उडय़ा मारत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळांवर अपघातांची शक्यता वाढली आहे.

बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यात नोकरदार वर्गाची संख्या अधिक असल्याने रेल्वे स्थानकावर त्याचा ताण पडतो. त्यात बदलापूर रेल्वे स्थानकाची भौगोलिक रचना आणि सध्याच्या स्थानकाची क्षमता ही कधीच संपली असून स्थानकात मोठय़ा प्रमाणावर गर्दी होताना दिसते. स्थानकातील जिने अरुंद असल्याने तिथेही प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे बहुतेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून स्थानकाबाहेर जाण्याचा प्रयत्न  करतात. बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन या फलाटांवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे तिथे जिन्याची गरज गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे. त्यानंतर होम प्लॅटफॉर्मचाही विषय समोर आला होता. मात्र अद्याप तरी त्यातून कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. पहाटेच्या वेळी मुंबईकडे जाण्यासाठी फलाट क्रमांकतीनवर प्रवाशांची अधिक गर्दी असते. जागा मिळवण्यासाठी प्रवासी लोकल थांबण्याआधीच लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर्जतकडून येणाऱ्या आणि बदलापूरला उतरणाऱ्या प्रवाशांची मात्र अडचण होते. अनेकदा चढणारे प्रवासी आणि उतरण्याच्या तयारीत असलेल्या अनेक प्रवाशांमध्ये वादही होतात. त्यावर आता बाहेरच्या प्रवाशांनीच पर्याय शोधला असून आता ते फलाटाच्या विरुद्ध दिशेने उडय़ा मारताना दिसत आहेत. तसेच उलटय़ा बाजूने चढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्याच वेळी फलाट क्रमांक दोनच्या रुळावरून पुण्याकडे जाणाऱ्या जलद एक्स्प्रेस, मालगाडय़ा आणि कर्जतकडे जाणाऱ्या लोकल जात असतात. त्यामुळे उडी मारतेवेळी एखादा प्रवाशाच्या जिवावर बेतण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी आता दोन रुळांमध्ये लोखंडी जाळ्या बसवण्याची मागणी होत आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांच्या उडय़ा टाळण्यासाठी काही महिन्यांपूर्वी लोखंडी जाळ्या बसवल्या होत्या. मात्र जाळ्यांचा भाग सोडून इतर भाग प्रवाशांनी तोडून तेथून चोरवाटा केल्या आहेत. त्यामुळे जीना द्या आणि नंतर वाटा बंद करा, असाही एक मतप्रवाह प्रवाशांमध्ये आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous railway crossing on badlapur railway station
First published on: 18-11-2016 at 01:25 IST