महापौरांचे आयुक्तांना पत्र

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये ठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुढे येत असतानाच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीच आता अशा बेकायदा बांधकामांना आळा घालण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना एका पत्राद्वारे केल्या आहेत. शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाच्या मुद्दय़ावरून काही राजकीय नेत्यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून या पार्श्वभूमीवर महापौरांनी या पत्रामध्ये पालिका साहाय्यक आयुक्तांच्या कार्यशैलीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गेल्या वर्षभरापासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात पालिका प्रशासन व्यस्त आहेत. त्याचाच फायदा घेऊन भूमाफियांकडून बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तक्रारी पुढे येत आहेत. कळवा परिसरात बेकायदा इमारत उभारण्यात येत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पुढे आली होती. या बांधकामावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका होऊ लागली होती. या टीकेनंतर महापालिका प्रशासनाने इमारतीचे बांधकाम पाडले होते. अशाच प्रकारे काही भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली होती. त्यानंतरही शहरात बेकायदा बांधकामांचे सत्र सुरूच असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्येही बेकायदा बांधकामांचा मुद्दा गाजला होता.

वाढत्या बेकायदा बांधकामाच्या मुद्दय़ावरून काही राजकीय नेते सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी बेकायदा बांधकामाच्या मुद्दय़ावरून आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना एक पत्र पाठविले आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी राजकीय नेते करीत आहेत. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामासंबंधीचे वृत्त छापून येत आहे. या बांधकामांच्या मुद्दय़ावरून महापालिका प्रशासनावर आरोप होत असून त्याचबरोबर पालिका पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बदनामी होत आहे, असे महापौरांनी पत्रात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदा बांधकामांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी तसेच याबाबत राजकीय नेत्यांकडून होणारे आरोप याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहेत की नाहीत, याचे स्पष्टीकरण द्यावे. तसेच अनधिकृत बांधकामे सुरू असतील तर संबंधित प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त काय कारवाई करीत आहे, याचीही माहिती मिळणे गरजेचे आहे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.