भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या मूळच्या कल्याणच्या. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात त्यांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी शासनाकडे केली.
डॉ. आनंदीबाई यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कल्याणमधील काही संस्थांनी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. स्त्री शिक्षणाविषयी जागृती नसतानाच्या काळात आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अशा कर्तृत्ववान महिलेचा आदर्श जनतेसमोर ठेवण्यासाठी त्यांचे कल्याणमध्ये स्मारक आवश्यक आहे, असे आमदार पवार म्हणाले.
टपाल तिकीट प्रसिद्ध करावे – डॉ. अंजली कीर्तने भारतीय टपाल व्यवस्थेचा सर्वाधिक लाभ डॉ. आनंदीबाईंनी घेतला. अमेरिकेतील मैत्रिणीला त्यांनी शंभरहून अधिक पत्र, भेटवस्तू टपालाने पाठवल्या आहेत. हा सगळा ठेवा अमेरिकेत पाहण्यास मिळतो. भारतीय टपाल विभागाने डॉ. आनंदीबाई जोशी यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध करावे, अशी मागणी चरित्र लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांनी केली. कोकण इतिहास परिषदेची कल्याण शाखा व महिला उत्कर्ष मंडळ यांनी आनंदीबाईंच्या जयंती निमित्त भिडेवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास साठे, परिषदेचे अध्यक्ष प्रा. जितेंद्र भामरे, मंडळाच्या वंदना राणे, पुरातत्व विभागाचे अरूणचंद्र पाठक, माजी आमदार प्रभाकर संत उपस्थित होते.
लहानपणापासून आनंदीबाईंना शिक्षणाची आवड होती. याच ओढीने त्यांनी प्रवासाच्या अत्याधुनिक सुविधा नसतानाच्या काळात दीडशे वर्षांपूर्वी अमेरिका गाठले. तेथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आनंदीबाईंनी लिहिलेल्या हस्ताक्षरातील प्रबंधाची प्रत अमेरिकेत आजही पाहण्यास मिळते. भारतात परतल्यावर आनंदीबाईंनी अमेरिकेतील मैत्रिण कारपेंटर हिला शंभरहून अधिक पत्रे लिहिली. भेटवस्तू पाठवल्या. हा ठेवा अमेरिकेत आजही पाहण्यास मिळतो. या शंभर पत्रांचा अभ्यास करून आपण त्यांचे चरित्र लिहिले, असे डॉ. अंजली कीर्तने यांनी सांगितले. यावेळी डॉ. साठे यांचे ‘कल्याणचे शिक्षण’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
परिसंवादाचे आयोजन
कल्याणमधील स्त्री शिक्षण मंडळातर्फे आनंदीबाई जोशी लोक विद्यालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या सहकार्याने परिचारिका विद्यालयातील परिचारिकांचा परिसंवाद आयोजित केला होता.