राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात बॅनरबाजी सुरू झाली असतानाच, त्यापाठोपाठ आज (शनिवार) सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी देखील केली. समर्थकांच्या हातात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पोस्टर्ससह शिवसेना नावाचा उल्लेख असलेले आणि धनुष्यबाणाची निशाणी असलेले झेंडे देखील होते. यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाडीवर उभा राहून समर्थकांशी संवाद साधला.

लुईसवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि त्याच बरोबर सेवा रस्ते बंद केले होते. ठाण्यात जोरदार पाऊस सुरू झाला असून अशा परिस्थतीतही शिंदे समर्थक पावसात भिजून घोषणा देत होते. विविध भागातून शिंदे समर्थकांचे जथ्थे या ठिकाणी येत होते.

“सत्तेमध्ये असून आमच्यावर अन्याय होत असेल तर…”; बंडखोर आमदारांच्या समर्थनात श्रीकांत शिंदेंचे शक्ती प्रदर्शन

ठाण्यातील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. ठाण्याच्या माजी महापौर तसेच ठाणे जिल्हा महिला प्रमुख मिनाक्षी शिंदे यांची देखील त्याठिकाणी उपस्थिती होती.

सत्ता असून कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर त्या सत्तेचा काय फायदा? –

“एकनाथ शिंदे हे शिवसेनेत आणि शिवसैनिक आहेत. ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार सोबत जाणं ही इतिहासातील पहिली घटना आहे. एवढ्या आमदारांनी विश्वास दाखवला त्याला कारण त्यांच्या मनात धुसफूस होती, त्याचा स्फोट झाला. अडीच वर्षे आघाडी झाली, मात्र त्यातून बाहेर पडलो पाहिजे असे का वाटले? कुणाचं तरी चुकत असेल. एकटे एकनाथ शिंदे नव्हे तर ५० आमदारांना त्रास होत होता. आमचा मुख्यमंत्री आहे चांगले दिवस येतील अशी लोकांना अपेक्षा होती, पण आज देखील शिवसेना कार्यकर्ता फक्त लढतोय. सत्ता आली मात्र ती कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली नाही. आमदारांना निधी मिळत नाही. सत्ता असून कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर त्या सत्तेचा काय फायदा?” असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याला आणि लोकांना सांभाळले –

तर, “एकनाथ शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नाही, ठाण्यातील सर्व ६७ नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत . त्यांच्यासोबत राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह जिल्ह्याला आणि लोकांना सांभाळले आहे.” असे ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.