ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकांच्या बांधकामांमध्ये अडसर ठरणारे २४७ वृक्ष तोडण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  हि परवानगी देताना न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा निकाल आल्यानंतरच २४७ पैकी १६३ वृक्ष तोडण्यात यावेत, असा निर्णय एका विकासकाच्या प्रस्तावावर घेण्यात आला आहे.  या विकासकाने १६३ वृक्ष तोडण्यासाठी तीन वेगवेगळे प्रस्ताव सादर केले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच शहरात हरित क्षेत्र वाढावावे या उद्देशातून प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षांपुर्वी पाच लाख वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला होता. एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी असे उपक्रम राबविले जात असले तरी दुसरीकडे मात्र वृक्ष प्राधिकरण समितीकडून विकासकांच्या बांधकामात अडसर ठरणाऱ्या वृक्षांना तोडण्यास परवानगी दिली जात आहे.

मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत अशाचप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या पटलावर शहरातील विकासकांच्या बांधकामामध्ये तसेच रस्ता रुंदीकरणामध्ये बाधीत ठरणारे वृक्ष तोडण्याचे आणि पुनरेपणाचे एकूण सात प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.  यामध्ये एकाच विकासकाने १६३ वृक्ष तोडण्यासाठी तीन वेगवेगळे प्रस्ताव सादर केले होते. हे वृक्ष तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली असली तरी समितीने विकासकाला त्यासाठी अट घातली आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा निकाल आल्यानंतरच हे वृक्ष तोडण्यात यावेत, अशा स्वरुपाची ही अट आहे. याशिवाय, या विकासकांच्या बांधकामामध्ये बाधीत होणाऱ्या इतर २४८ वृक्षांचे पुनरेपण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवाडा ते वडपे या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधीत होणाऱ्या ९७३ वृक्षांचे पुनरेपण आणि ५१७ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिला होता. मात्र, हा प्रस्ताव समितीने रोखून धरला आहे. या भागाची पाहाणी केल्यानंतरच त्यास परवानगी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका सुत्रांनी दिली.