मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन, वेल्हेमध्ये कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हेच सध्याच्या काळातील राष्ट्रकार्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवारी संध्याकाळी भिवंडी तालुक्यातील वेल्हे गावात लोढा समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या गोळवलकर गुरूजी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गोळवलकर गुरुजी यांच्या मूर्तीचे अनावरण आणि कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कौशल्य विकास कार्यक्रम योग्य प्रकारे राबविल्यास आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या वरदान ठरू शकेल. कारण देशातील ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अभाव हा आपल्यापुढील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे योग्य शिक्षणाद्वारे नव्या पिढीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळेच सरकारनेही कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रचलीत शिक्षण व्यवस्थेतून डॉक्टर्स, इंजिनिअर्स तयार होतात. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाच्या संस्काराने माणूस घडणे आवश्यक आहे. समाजातील तळागाळापर्यंत कौशल्य विकासाचे शिक्षण मिळाले तर त्यांनाही स्वाभिमानाने जीवन जगता येईल, असा विश्वास भय्याजी जौशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
प्रारंभी खासदार कपिल पाटील, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य नरेशचंद्र, विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक विवेक पंडित यांनी आपले विचार मांडले. आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आमदार किसन कथोरे, रवींद्र चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.