शिवसेनेने वचननाम्यातून ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप करत चौक सभा

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी मांडलेल्या वचननाम्यातून ठाणेकरांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे विभागातर्फे गुरुवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. तलावपाळी ते पाचपाखाडी या मार्गावरून काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या कालावधीत शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणे शहरात गुरुवारी मनसेच्या वतीने शिवसेनेच्या वचननाम्याविरोधात जनजागर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी शहरातील विविध भागातून मनसेचे कार्यकर्ते आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून या मोर्चास सुरुवात झाली. तलावपाळी, राम मारुती रोड आणि महापालिका मुख्यालय परिसर असा हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाच्या मार्गामध्ये वाहतूक पोलिसांनी वाहने रोखली होती. त्यामुळे काही काळ शहरात वाहतूक कोंडी झाली. अनेकांना या काळात इच्छितस्थळी पोहोचताना अडथळ्यांचा सामना करावा लागला.

 मोर्चा महापालिका मुख्यालय परिसरात आल्यानंतर येथे चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यात समूह विकास योजना आणली. त्या वेळी शिवसेनेच्या नेत्यांनी ठिकठिकाणी फलक उभारले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या मतदारसंघातील कोपरी, वागळे इस्टेट भागातील नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यामुळे समूह विकास योजनेचे पुढे काय झाले, हे ठाणेकरांना सांगा अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या, असे अविनाश जाधव म्हणाले. करोनाकाळात ठाणे शहरात उभारण्यात आलेल्या ग्लोबल रुग्णालयाच्या माध्यमातून महापालिका अधिकाऱ्यांनी घोटाळे केल्याचा आरोपही केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.