डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, अशी तक्रार करणाऱ्या नातेवाईकांची तक्रार राज्य ग्राहक निवारण मंचाने फेटाळून लावत डोंबिवलीतील डॉक्टरला दिलासा दिला.
डोंबिवलीत एका डॉक्टरांच्या रुग्णालयात मागील १५ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. एक महिला पाठीच्या दुखण्याने आजारी असल्याने तिला डॉ. गोरूले (नाव बदलले आहे) यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व प्रकारच्या तपासण्या करून डॉक्टरांनी या महिलेला प्राथमिक उपचार सुरू केले होते. पाठीच्या वेदना सातत्याने वाढत गेल्या. या महिलेला त्रास असहय़ होऊ लागल्याने तज्ज्ञ डॉक्टरांना रुग्णालयात पाचारण केले. त्यांच्या सल्ल्याने काही उपचार करण्यात आले.
महिला बरी व्हावी यासाठी दिवसभर उपचार सुरू होते. अचानक रात्रीच्या वेळेत उपचार घेणाऱ्या महिलेची तब्येत खूप बिघडली. उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले. डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला, असा आरोप करीत या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला.
आपण महिलेला वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. त्यावर महिलेच्या नातेवाईकांनी विश्वास ठेवला नाही. नातेवाईकांना डॉक्टरांनी त्या महिलेचे शवविच्छेदन करण्याची सूचना केली. ती नाकारण्यात आली. पत्नीच्या निधनानंतर पतीने उपचार करणाऱ्या डॉक्टरविरोधात १५ लाख नुकसानभरपाईचा दावा राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे केला.
गेल्या १५ वर्षांत या खटल्यावर आयोगाकडे सुनावणी सुरू होती. महिला रुग्णालयात दाखल झाल्यापासून डॉक्टरांनी महिलेवर वैद्यकीय उपचार केले. शरीर ‘इनअ‍ॅक्टिव्ह’ असेल आणि त्याच वेळी फुप्फुसात रक्ताच्या गाठी तयार झाल्या तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात डॉक्टरांचे वकील अ‍ॅड. शिरीष देशपांडे, अ‍ॅड. हर्मेश नागी, अ‍ॅड. निशिगंधा गुरव, अ‍ॅड. अनिल बावीसकर यांना यश आले. हे म्हणणे मान्य करीत मंचाने डॉक्टरांना दिलासा दिला.