शहरामध्ये फिरताना जिकडे तिकडे ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे खुलून गेलेले दिसतात. निवृत्त झाल्यानंतर आयुष्याचे उत्तरायण साजरे करणाऱ्या या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर जीवनाचा परिपूर्ण आनंद घेतल्याचे समाधान असते. मात्र काही ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये एकाकी जगणे येत असते. मुले शिकून मोठी होतात. परदेशी जातात. त्यांची वर्षांतून जेमतेम एकदा भेट होते. काहींच्या तर ती वार्षिक भेटही नशिबी नसते. अशा प्रकारे कुटुंबातील सदस्य दुरावल्याची खंत अशा ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असते. त्यांची ही परिस्थिती जाणून घेऊन त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करण्यासाठी पुढे येणाऱ्या तरुणाईचे दर्शन दुर्लभ झाले आहे. अशाच एका तरुण आणि ज्येष्ठाची कथा ‘शब्द’ या लघुपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न ठाण्यातील ‘स्व-क्रिएशन’या तरुणांच्या निर्मिती संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

लघुपटाच्या पहिल्या दृश्यामध्ये एक तिशीतला मुलगा तलावाच्या किनारी जॉगिंग करताना दिसतो. शेवटी धावून थकल्यानंतर तो एका बाकावर येऊन बसतो. तेवढय़ात तिथे एक आजोबा येतात आणि ते जोरजोरात सूर्यदेवाची प्रार्थना करू लागतात. या मुलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांची आपली प्रार्थना सुरूच असते. शेवटी हा मुलगा वैतागून तिथून जायला निघतो तेवढय़ात ते आजोबा हसू लागतात. त्या मुलाला नेमका कसला त्रास होतोय, हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत असतात.  मात्र हा रागावलेला मुलगा त्यापैकी काहीच सांगण्यास तयार होत नाही. मात्र असेच बोलण्याच्या ओघात आजोबा त्यांच्या दिनक्रमाबद्दल सांगण्यास सुरुवात करतात. ते आता ज्येष्ठ नागरिक असले तरीही ते घरातील कर्ते पुरुष आहेत. त्यांच्यावर घर अजूनही अवलंबून आहे. ते नसले तर घरात अनेक अडचणी उद्भवतात. अर्थात त्याबद्दल त्यांची कसलीही तक्रार नाही. त्यांचा मुलगा एका विख्यात कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर आहे. मात्र त्यांची खंत फक्त इतकीच की अलीकडे बापलेकामध्ये फारसा संवाद होत नाही. नात्यांमधील शब्द हरवून गेले की काय असे त्यांना वाटते. इतका वेळ आजोबांचे बोलणे शांतपणे ऐकणारा तो तरुणही मग बोलायला लागतो. घरातील तणावपूर्ण परिस्थिती तो घरच्यांसमोर मांडतो. त्यावेळी ते आजोबा त्याला सांगतात की चूक कोणाची आहे यापेक्षा ती काय आहे आणि ती कशी सुधारू शकतो याचा प्रयत्न केला पाहिजे. या आजोबांसोबत असणारा तो मुलगा कोण असतो? ते ज्येष्ठ आजोबा कोण असतात? त्या दोघांचे एकमेकांशी नेमके काय नाते असते? याचा खुलासा स्व क्रिएशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘शब्द’ या लघुपटाच्या शेवटी आपल्याला होतो.

ठाण्यात राहणाऱ्या मधुरा जोशीला लहानपणापासूनच संगीताची खूप आवड होती. मुळात घरातच संगीताचे वातावरण असल्यामुळे आजीकडून आई आणि आता आईकडून मधुराकडे गाण्याची कला आली होती. शाळेत आणि महाविद्यालयात असल्यापासून अनेक गायन स्पर्धेत मधुराने आपली कला सादर केली आणि त्यासोबतच राज्यनाटय करत असल्यामुळे अभिनय करण्याची संधीही तिला मिळाली. शेवटी महाविद्यालय संपले आणि मधुरा व तिच्या मित्रमैत्रिणींनी ठरवले की, आपण सगळे मिळून आपला कलाविष्कार लघुपटाच्या माध्यमातून दाखवून देऊ. तिथूनच ‘स्व क्रिएशन’ची सुरुवात झाली. या गटातील भूषण वाणी याच्याकडे खूप दिवसांपासून एक कल्पना होती जी त्याने सगळ्या गटाला सांगितली. सगळ्यांना ती कल्पना पटली व ते लघुपट बनवण्याच्या मार्गावर चालू लागले. ओंकार जोशीने दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली. छायाचित्रीकरणाची जबाबदारी सागर दवणे व त्यासोबत बेहेरू प्रजापती, सौरभ पंडित आणि तेजेस पेडणेकर यांनी स्वीकारली. संगीत दिग्दर्शकाचे काम मयुरेश जोशीने केले. सागर कोलते याने संकलनाची जबाबदारी उचलली. किरण साबळे कार्यकारी निर्माता बनला. निर्मिती टीममध्ये ओंकार राऊत निनाद वैशंपायन आणि अथर्व हिंगणे यांनी काम केले. सहदिग्दर्शक व गायकांचे काम मधुरा जोशीने केले तर तक्षिलसिंह खानविलकर, प्राजक्ता अर्नाळकर आणि रिदयी बहाद्दरपूरकर हे कलाकार त्यामध्ये होते. या सर्वासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो ज्येष्ठ नागरिक म्हणून कोणाचा समावेश करायचा. खूप शोधल्यानंतर शेवटी बाळ कर्वे यांनी हे काम करण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर शब्द च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

लघुपटाचा कोणताच पूर्वानुभव नसल्याने दुपारी १२ पर्यंत चित्रीकरण संपवून निघता येईल, या विचारात असलेल्या मुलांचे काम संपण्यास चक्क संध्याकाळचे ६ वाजले होते. तरही छायाचित्रण पूर्ण होऊ शकत नव्हते. तलावाकाठचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी या टीमला तीन दिवस लागले. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ‘शब्द’ची संकलन प्रक्रिया सुरू झाली. १५ दिवस दिवस-रात्र मेहनत करून ‘शब्द’ पूर्णत्वास आला. ‘शब्द’ या लघुपटाचे प्रदर्शन आणि अधिकृत निवड अहमदनगर लघुपट स्पर्धा, मनतरंग महोत्सव आणि माय मुंबई लघुपट फेस्टिव्हलमध्ये झाली. त्याचबरोबर मराठी दिनानिमित्त ‘शब्द’ हा लघुपट दूरदर्शन वाहिनीवरही प्रदर्शित करण्यात आला होता. अशा प्रकारे ‘शब्द’  जाणकारांची दाद मिळत असतानाच ‘स्व-क्रिएशन’ने ‘बंधन’व ‘एक एकला एकाकी’ नावाच्या दोन नव्या कोऱ्या लघुपटांची निर्मिती केली. ‘शब्द’ हा लघुपट आपण यू-टय़ूब वर, स्व-क्रिएशनच्या अधिकृत पेजवर पाहू शकतो. सध्या ही टीम त्यांच्या पुढच्या निर्मितीच्या तयारीला लागले आहेत. ‘बब्बड’ हे त्यांच्या पुढील लघुपटाचे नाव आहे. साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आपल्याला ‘बब्बड’ पहायला मिळेल.