येथील औद्योगिक विभागात मंगळवारी सायंकाळी वायू प्रदूषणाचा त्रास जाणवू लागला. नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांना तत्काळ बोलावून त्यांना ही समस्या सांगितली. या उग्र वासामुळे काही नागरिकांना श्वसनाचा व उलटय़ांचा त्रास झाला. तरीही प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मात्र हा गंध साधारण स्वरूपाचा असल्याचा अहवाल तयार केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
डोंबिवली शहरातील औद्योगिक विभागात अनेक रायायनिक कंपन्या असून त्यातून अधूनमधून तीव्र स्वरूपाचे वायू प्रदूषण होते. तसेच नाल्यांमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा खूप त्रास होतो. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागरिकांना अचानक वायू प्रदूषणाचा त्रास जाणवू लागला. येथील रहिवासी राजू नलावडे यांनी तत्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र सांगेवार यांना दूरध्वनीवर याविषयी तक्रार केली. त्यांनी अधिकारी तपासणीसाठी पाठवितो असे सांगितले. या वासामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा तसेच उलटय़ांचा त्रास जाणवू लागला. एक तास उलटला तरी अधिकारी न आल्याने नागरिकांनी मानपाडा पोलीस स्टेशनला धाव घेत याविषयी तक्रार नोंदिवली. मानपाडा पोलीस निरीक्षक एन.बनकर यांनी नागरिकांसोबत त्या भागाची पाहणी केली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तेथे आले, मात्र त्या वेळी उग्र वासाचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र सांगेवार म्हणाले, नागरिकांनी रात्री उग्र वास येत असल्याचे कळविले. त्याची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तेथे पाठविले. मात्र हा गंध सर्वसाधारण स्वरुपाचा असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. स्थानिक रहिवासी उज्वला पाटकर यांना स्वत:ला श्वसनाचा व उलटय़ांचा त्रास झाल्याचे सांगितले. रासायनिक कंपन्या रात्रीच्या वेळेस हवेत रसायनमिश्रित धूर सोडतात यामुळे आम्हाला कायम असा त्रास जाणवतो.
मात्र आमची कोणीच दखल घेत नाही, असा त्यांचा आरोप आहे. ग्रामपंचायत सदस्य राजू नलावडे म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आम्हाला सहकार्य करीत नाहीत. वास येत असल्याचे त्यांना कळविल्यावर तासाभरानंतर ते येतात आणि तोपर्यंत वास कमी झालेला असतो. यासंदर्भात नागरिक खोटय़ा तक्रारी करणार नाहीत.