डोंबिवलीची जैवविविधता निसर्ग प्रेमींकडून संकलित 

डोंबिवली ‘नेचर रेस’ उपक्रमाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी करण्यात आली होती.

उपक्रमाद्वारे दुर्मीळ पक्षी, फुलपाखरे आणि कीटकांच्या नोंदी आणि छायाचित्रांचे संकलन

डोंबिवली : सृष्टीभान सामाजिक संस्था आणि अनुनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डोंबिवली ‘नेचर रेस’ उपक्रमातून डोंबिवली शहर आणि आसपासच्या परिसरातील निसर्ग, दुहळ पक्षी, फुलपाखरू, कीटक, कोळी याबाबतची सहभागी निसर्गप्रेमींकडून माहिती संकलित करण्यात आली आहे.  या उपक्रमात विविध वयोगटांतील सुमारे ९५ नागरिकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमामुळे डोंबिवलीसारख्या शहरी भागातील जैवविविधतेचे सुंदर रूप सहभागी व्यक्तींनी छायाचित्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.

डोंबिवली ‘नेचर रेस’ उपक्रमाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी करण्यात आली होती. यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना आढळणाऱ्या पक्षी आणि कीटकांची माहिती कशा प्रकारे संकलित करावी आणि त्याच्या नोंदी कशा ठेवाव्यात याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामध्ये वय वर्षे १० ते ७० वयोगटांतील सुमारे ९५ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. त्यानुसार या सर्वानी डोंबिवली शहर आणि आसपासच्या परिसरातील मोकळे माळरान, घनदाट झाडी आणि इतर विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्षरीत्या भेट दिली. एकटय़ाने, समूहाने, दोन जणांच्या गटाने ज्या पद्धतीने शक्य होईल तसे अनेकांनी दुर्मीळ पक्षी, फुलपाखरे, मधमाशांची पोळी, कीटक, कोळी यांच्याबाबतच्या अनेक नोंदी आणि छायाचित्रे संकलित केली. त्याबरोबरच विविध फुलांचीदेखील छायाचित्रे घेतली. यावेळी शहरी भागात दुर्मीळ असणारे टिबुकली अर्थातच लांदे बदक, छोटा मराल, विणीच्या हंगामातील सुगरण, थुंकी कीटक, काळटोप मुनिया यांसारख्या विविध पक्ष्यांचे आणि कीटकांची छायाचित्रे निसर्गप्रेमींनी टिपली. या स्पर्धेत काही बाल निसर्गप्रेमींनीदेखील आपला सहभाग नोंदवला होता.

डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात थंडीत मोठय़ा प्रमाणात तलवार बदक, थापटय़ा, चक्रांग, भुवई बदक तसेच मोठा ठिपक्यांचा गरुड, दलदल ससाणा यांसारखे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी आढळतात. तर उन्हाळ्यात बऱ्याच शिकारी पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. शीक्रा, कापशी यांसारखे पक्षी पावसाळ्यात कमी दिसतात. सुरुवातीला स्थानिक बदक प्रजाती, हळदी-कुंकू बदक, छोटा मराल यांसारख्या बदकांच्या प्रजाती आढळतात तसेच कमळपक्षी प्रजाती (जकेना) तसेच केमकुकडी (वॉटर कॉक) यांसारख्या प्रजाती जास्त दिसतात, अशी विविध निरीक्षणे यावेळी सहभागी व्यक्तींकडून नोंदवण्यात आली. या उपक्रमामध्ये अवघ्या अकरा वर्षांच्या अर्णव पटवर्धन आणि तेरा वर्षांच्या मैत्रयी पुसाळकर यांच्याकडून सगळ्यात जास्त नोंदी आणि छायाचित्रे जमा करण्यात आली आहेत. ऑनलाइन पद्धतीने नुकतीच या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी छायाचित्रे आणि नोंदी सादर करण्यात आल्या. टाळेबंदीच्या काळात दिसून आलेले अनेक पक्षी आणि कीटक यांची संख्या कमी झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. या सर्व गोष्टींना वाढते प्रदूषण आणि मानवाचा निसर्गात होणारा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचे मत नोंदविण्यात आले.

नेचर रेस उपक्रमातून डोंबिवली शहरातील सुंदर जैवविविधता समोर आली आहे. आगामी काळात विद्यार्थी आणि पालक यांच्याकरिता शहराच्या आसपासच्या परिसरात निसर्गभ्रमंती आणि माहिती त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आहे.

– अमरेंद्र पटवर्धन, आयोजक, सृष्टीभान सामाजिक संस्था

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dombivli biodiversity compiled nature lovers ssh

ताज्या बातम्या