डोंबिवली- डोंबिवली पश्चिम, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्यात पालिकेच्या ह, क प्रभागातील अधिकाऱ्यांना यश आले आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्यात प्रशासन कमी का पडत आहे, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाला ग प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. प्रवाशांचे येण्याचे मार्ग बंद करुन फेरीवाले व्यवसाय करत असल्याने पादचारी अधिकाऱ्यांविषयी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर सुरुवातीचे काही दिवस सकाळच्या वेळेत अचानक पाहणी दौरे सुरू केले होते. आयुक्त डाॅ. दांगडे कधीही डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात येतील या भीतीने  डोंबिवलीतील प्रभागातील अधिकारी, कामगारांच्या सूचनेवरुन कामगार सूचना करत नाहीत तोपर्यंत फेरीवाले रस्ते, पदपथावर बसत नव्हते. सकाळ, संध्याकाळ रस्ते फेरीवाला मुक्त वाटायचे. आता आयुक्तांनी पाहणी दौरे थांबविले आहेत हे लक्षात आल्यावर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पुन्हा सकाळ पासून ते रात्री उशिरा पर्यंत फेरीवाल्यांनी ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे.

जिन्यांचे मार्ग बंद

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील स्कायवाॅकवरुन अनेक प्रवासी उर्सेकरवाडीत संत सावता माळी भाजी मंडईच्या जवळून जिन्याने उतरतो. या जिन्यांची मार्गिका फेरीवाल्यांनी अडगळीेचे, साठवणूक सामान, भाजी, फळांचे मंच लावून बंद केली आहे. या अडगळीतून मार्ग काढत प्रवाशांना जावे लागते. टिळक सिनेमा गल्लीतून रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना फेरीवाल्यांचा अडथळा सहन करावा लागतो. आयुक्तांच्या दौऱ्याच्यावेळी रेल्वे स्थानक भागात कामगार नियुक्त करुन फेरीवाल्यांनी हटविण्याची व्यवस्था किती गतिमान आहे, असा देखावा ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी उभा केला होता.

ग प्रभागात अरुण जगताप हा फेरीवाला हटाव पथकातील कामगार एका राजकीय पक्षाशी पदाधिकाऱ्याचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आपणास राजकीय आशीर्वाद असल्याने आपणास कोणी काही करणार नाही या विचारात असलेला हा कामगार फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्याच्या गेल्या वर्षापासून आयुक्त कार्यालयात तक्रारी आहेत. जगताप यांना खडेगोळवली, टिटवाळा विभागात बदली करावे अशी अनेक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राजकीय आशीर्वादामुळे त्यांची बदली होत नसल्याची कर्मचाऱ्यांची खंत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरीवाला हटाव पथकातील कामगारांच्या बदल्या आठ महिन्यापूर्वी करण्यात आल्या. या बदल्यांच्या यादीत डोंबिवलीत फेरीवाला हटाव पथकात कार्यरत अरुण जगताप यांचे नाव टाकण्यात फ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी टाळाटाळ केली. त्याचा गैरफायदा घेत आता जगताप घेत आहे. वरिष्ठांना दाखविण्यासाठी फेरीवाल्यांचे सामान जप्त करुन पालिकेत आणायचे, काळोख पडला की ते गुपचूपपणे सोडून द्याचे अशी प्रथा जगताप यांनी पाडली आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे भागातील फेरीवाले हटत नसल्याने आयुक्तांनी त्यांची तातडीने अन्य प्रभागात बदली करण्याची मागणी अनेक जाणकर नागरिकांनी केली आहे.

ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत हे मात्र फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. पादचाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, अशी साचेबध्द प्रतिक्रिया नियमित देतात. डोंबिवलीसाठी स्वतंत्र विभागीय उपायुक्त देऊनही फेरीवाले हटत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.