डोंबिवली – शहरातील एक क्रीडापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेक नामचिन खेळाडू घडविणाऱ्या डोंबिवली जीमखाना व्यवस्थापनावर मनमानी कारभाराचा आरोप करत जीमखान्याच्या काही सदस्यांनी डोंबिवली जीमखान्या समोर रविवारी सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले. सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली असताना, जीमखान्याची प्रतिमा डागळण्यासाठी असे उपोषणाचे नाटक कशासाठी, असा प्रश्न व्यवस्थापनाने केला आहे.

उपोषण विषयावरून डोंबिवली जीमखाना व्यवस्थापनात दुहीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुहीचा जीमखान्यात क्रिकेट, टेबल टेनिस, जलतरण अशा विविध क्षेत्रांत प्रशिक्षण घेत असलेल्या क्रीडापटूंच्या प्रशिक्षणावर परिणाम होता कामा नये, अशी मागणी क्रीडापटूंच्या पालकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. हा विषय चर्चेतून सोडवण्याचे आश्वासन दिले.
डोंबिवली जीमखान्याचे सदस्य आणि भाजपाचे माजी नगरसेवक राहुल दामले यांच्या नेतृत्वाखाली जीमखान्याचे बहुतांशी सदस्य या उपोषणात अधिक संख्येने सहभागी झाले आहेत. जीमखाना सदस्यांना विश्वासात न घेता जीमखान्याच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. तो विक्रीस काढला आला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता जीमखान्यात प्रशिक्षण संस्था, खासगी प्रशिक्षण संस्थांचे प्रशिक्षण नेमले जात आहेत. जीमखान्यातील व्यवहारांची कागदोपत्री माहिती मागवूनही ती दिली नाही. दुहीचे वातावरण टाळण्यासाठी सामोपचाराने चर्चा करण्याचा मार्ग उपलब्ध असताना त्याला व्यवस्थापनाकडून वळण दिले जाते. एककल्ली कारभार करून डोंबिवली जीमखान्याचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. सार्वजनिक हित विचारात घेऊन ही वास्तू चालविली पाहिजे. येथे मनमानी कोणाचीची खपवून घेतली जाणार नाही, असे उपोषणकर्ते राहुल दामले यांनी सांगितले.

हेही वाचा – सातारा येथील दोन खतरनाक गुन्हेगार डोंबिवलीत पिस्तुलासह अटक

जलतरण तलावात बाहेरील विद्यार्थ्यांना नऊ वाजता प्रवेश द्यावा. लाॅन टेनिस कोर्टाच्या ठिकाणी उत्सव काळात मंच दिले जातात. सभासद शुल्क सोळाशे रुपयांवरून सात हजार रुपये करण्यात आले आहे. त्या प्रमाणात सदस्यांना कोणत्या सेवा सुविधा दिल्या जातात. सदस्यांच्या काही मागण्या आहेत, त्याचा विचार केला जात नाही. शुल्क वाढवून कोणता हेतू साध्य केला जात आहे, असे प्रश्न दामले यांनी केले.

सभासदांच्या मुलांना क्रिकेट शुल्क माफ असावे. क्रिकेट मैदानाचा केवळ व्यापारी हेतूने उपयोग करू नये. गरीब गुणी क्रिकेटपटूंसाठी अल्पदराची सुविधा उपलब्ध असावी. गुन्हे दाखल जीमखान्याचा प्रशिक्षक डोंबिवली जीमखान्यात प्रशिक्षक म्हणून येतो. यामुळे जीमखाना टीकेचे लक्ष्य होतो, असे सदस्यांनी सांगितले. जीमखाना उपहारगृहामध्ये सदस्य आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचा विचार करून सेवाशुल्काचा विचार करावा. नवीन जागेत सभासदांसाठी जागा नाही. नुतनीकरणाची योजना दिसत नाही. उपहारगृहात मद्यसेवा देताना शुल्क आकारताना नियमाचा अवलंब व्हावा, अशा मागण्या सदस्यांनी केल्या आहेत. सदस्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने हा उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात आला आहे, असे दामले यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाणे : नाल्यात पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यवस्थापनाची भूमिका

एमआयडीसीने मुलांच्या क्रीडागुणांचा विकास करण्यासाठी जीमखान्याला भूखंड दिला आहे. त्याप्रमाणे या जागेचा वापर केला जातो. ना नफा ना तोटा तत्वावर ही वास्तू चालविली जाते. नवीन खेळ धोरणाप्रमाणे डोंबिवली जीमखान्याचा विकास व्हावा या उद्देशातून नवीन क्रीडा अकादमी आणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शासन नियमाचे कुठेच उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतील जात आहे. २१ वर्षांवरील क्रीडापटूंना येथे प्रवेश द्यायचा नाही का. ते अन्यायकारक होईल. सदस्यांना बाजू मांडण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले असताना उपोषण करून जीमखान्याची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न आहे. जीमखान्याचे उपविधी आणि एमआयडीसीचा भूखंड देण्याचा उद्देश याचा विचार सदस्यांनी करावा. जीमखाना विक्रीस काढला आहे, असा आरोप सदस्य करतोय तर त्याचे पुरावे द्या, अशी मागणी व्यवस्थापनाने केली आहे.