कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या याद्या मतदारांना पालिका मुख्यालय, १० प्रभाग क्षेत्र कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३१ मे २०२२ पर्यंतची विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी (उल्हासनगर महापालिका) यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सुरू केली आहे. त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून गुरुवारी मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या, असे आयुक्त दयानिधी यांनी सांगितले.




या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २३ जून ते १ जुलै मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मतदारांचा प्रभाग बदलणे, विधानसभा यादीत नाव असुनही प्रभाग यादी नाव नसणे, यादी विभाजन करताना कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुका यावेळी दुरुस्त केल्या जाणार आहेत. हरकती, सूचनांची दखल घेतल्यानंतर ९ जुलै रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ३१ मे २०२२ पर्यंतच्या मतदार यादीनुसार पालिका हद्दत १२ लाख ३९ हजार १३० मतदार आहेत. यामध्ये सहा लाख ६१ हजार पुरुष मतदार, पाच लाख ७६ हजार महिला मतदार आहेत. विशेष मतदारांची संख्या ३७४ आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
पालिकेने सतराशे पानांच्या ऑनलाईन मतदार याद्या ऑनलाईन प्रणालीत जाहीर केल्या आहेत. या मतदार याद्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोठे पाहण्यास मिळतील याचा उल्लेख पालिकेच्या ऑनलाईन प्रणालीत केला नसल्याने अनेक रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, निवडणूक अधिकारी सुधाकर जगताप, सचिव संजय जाधव उपस्थित होते.