३१ डिसेंबरच्या तोंडावर सरकारचे आदेश; गृहनिर्माण संस्थांनाही बंधनकारक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३१ डिसेंबरच्या रात्री जर पार्टी करून मद्यपानाचे बेत रचत असाल तर मद्यपरवाना घेणे आवश्य आहे. प्रत्येक पार्टीसाठी १३ हजार ५० रुपयांचा परवाना काढणे राज्य उत्पादत शुल्क विभागाने बंधनकारक केले आहे. या नियमावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी परवान्यासाठी कुणी पुढे येत नसल्याचेही सिद्ध झाले आहे. वसईतून तर केवळ मद्यपरवान्याचा एकच अर्ज आला आहे.

डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर लोकांना वेध लागतात ते नववर्षांच्या स्वागताचे. ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करून नववर्षांचे स्वागत केले जाते. या पाटर्य़ासाठी हॉटेल, क्लब आणि रिसॉर्ट सज्ज झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या आकर्षक योजनाही आणल्या आहेत. परंतु उत्पादक शुल्क खात्याच्या नियमामुळे या पार्टीचा विचका होण्याची शक्यता आहे. मद्यपान करण्यासाठी वैयक्तिक परवाना आवश्यक असतो. तो घेणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्येक पार्टीच्या आयोजकांनी जर पार्टीत मद्यपान होत असेल तर शुल्क भरून परवाना घेणे बंधनकारक केले आहे. एका रात्रीसाठी हे शुल्क आहे १३ हजार ५० रुपये. उत्पादक शुल्क कार्यालयात आगाऊ शुल्क भरून हा परवाना दिला जाणार आहे.

या निर्णयावर सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या इमारतीच्या गच्चीवर किंवा आवारात पार्टी करतो. ती आमची खाजगी जागा आहे मग आम्हाला या निर्णयाची सक्ती का असा सवाल वसईच्या अमित शिंदे यांनी केला आहे. वर्गणी काढून आम्ही पैसे गोळा करतो आणि पार्टी करतो. १३ हजार ही रक्कम खूप मोठी असून ती भरणे शक्य नसल्याचे त्यांने सांगितले.

वसईतून परवान्यासाठी अवघा एकच अर्ज

वसई-विरार पट्टय़ात अनेक रिसॉर्टस आहेत. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी ते सज्ज झाले आहे. मद्यविक्रीचा परवाना नसताना त्यातील अनेक ठिकाणी मद्यविक्री होत असते. ३१ डिसेंबरच्या रात्री या रिसॉर्टमध्ये खास पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारच्या परवान्यासाठी अर्ज केलेला नाही. वसईत गुरुवापर्यंत फक्त एकाच क्लबने अशा परवान्यासाठी अर्ज केला होता. ३१ डिसेंबरच्या आधी परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढेल असे निरीक्षक दळवी यांनी सांगितले.

हा नियम नवा नाही. सर्व खाजगी पार्टी आयोजकांना असा परवाना घेणे बंघनकारक आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मोठय़ा प्रमाणात मद्यपान केले जाते. त्यामुळे मद्यप्राशन करणाऱ्यांनी एक दिवसाचा परवाना जो पाच रुपये आहे, तो घेणे आवश्यक आहे. परवान्याशिवाय कुठे पार्टी होत असेल तर आमचे पथक जाऊन कारवाई करेल.

सुहास दळवी, उपनिरीक्षक, राज्य उत्पादक शुल्क.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking license in 13 thousand
First published on: 18-12-2015 at 02:00 IST