|| भगवान मंडलिक

प्रतीक्षा यादी संपविण्यासाठी कल्याण आरटीओचे रविवार, सुट्टीच्या दिवशीही चाचण्यांचे नियोजन

कल्याण : कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात पक्क्या चाचणीची अनुज्ञप्ती (परवाना) मिळण्यासाठी उमेदवारांना तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकांना नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायासाठी तातडीने पक्क्या वाहनांची अनुज्ञप्ती आवश्यक असते. अशा नवीन वाहनचालकांची सर्वाधिक कोंडी झाली आहे. यापूर्वी ही अनुज्ञप्ती १५ दिवसांत मिळत होती. करोना महामारीचा फटका कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागालाही बसल्याने प्रतीक्षा यादी वाढली आहे. ही यादी संपविण्यासाठी आरटीओ अधिकारी, कर्मचारी आठवड्यातील नियमित कामांच्या दिवसांसह सुट्टीच्या दिवशीही उपस्थित राहून पक्क्या चाचणीची अनुज्ञप्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले.

पक्क्या वाहनाची अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी अनेक वाहनचालक थेट अथवा काही मध्यस्थांच्या मार्फत आरटीओ कार्यालयात पोहोचत आहेत. प्रतीक्षायादी लांबलचक असल्याने तात्काळ क्रमांक लागत नसल्याने नवीन वाहनचालक, मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रांचे मालक नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेक नवतरुणांना नोकरीच्या ठिकाणी वाहन चालविण्याचा परवाना आहे का म्हणून विचारणा केली जाते. त्यांना पक्क्या वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्तीची गरज असते. काही तरुणांनी नोकऱ्या गेल्याने वाहतूक परवाना असणारी (टी परमिट) वाहन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण वाहतूक व्यवसायात उतरले आहेत. हे सगळे चालक आरटीओ कार्यालयातून पक्की अनुज्ञप्ती मिळाली की राज्यात वाहन चालविण्यास मोकळे होतात. हातात वाहन आहे पण पक्का परवाना नसल्याने गाडी बाहेर काढू शकत नाही, अशी अवस्था काही वाहनचालकांची झाली आहे. खासगी मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रातून  आरटीओमध्ये वाहनचालकाची पक्की अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी उमेदवारांनी मागील पाच ते सहा महिन्यांपासून नोंदणी केली आहे. त्यांना अद्याप क्रमांक मिळालेला नाही. सहा महिने उलटूनही क्रमांक लागत नसल्याने मध्यस्थ आणि उमेदवार यांच्यात अलीकडे वाद होऊ लागले आहेत. शिकाऊ वाहनचालकाची अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर पक्की अनुज्ञप्ती मिळण्यासाठी उमेदवाराने एक महिन्यात आरटीओ कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते. एक महिन्यात ही नोंदणी केली नाही तर शिकाऊ अनुज्ञप्ती रद्द होते. पुन्हा शिकाऊ प्रशिक्षणाची अनुज्ञप्ती उमेदवाराला काढावी लागते. हा भुर्दंड अलीकडे सोसावा लागत आहे, असे उमेदवारांनी सांगितले.

सुट्टीच्या दिवशीही विभाग सुरू

कल्याण आरटीओ कार्यालयातील काही कर्मचारी निवृत्त झाले. काही बदली होऊन गेले तर काही जण करोनाने बाधित आहेत. कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता आहे. अशाही परिस्थितीत शिकाऊ उमेदवारांची परीक्षा, पक्क्या चाचणीसाठी अनुज्ञप्तीची प्रतीक्षा यादी लवकर संपावी यासाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते काम पूर्ण होईपर्यंत कार्यालय सुरू असते. आपण स्वत: प्रथम वर्ग अधिकारी असूनही चाचणी वाहनतळावर उभे राहून मोटार वाहन निरीक्षकाचे काम करीत आहोत. सार्वजनिक सुट्टी, रविवारीही ही कामे सुरू आहेत. शिकाऊ, पक्क्या चाचणीसाठी उमेदवारांना फार प्रतीक्षा करावी लागू नये हा यामागील उद्देश आहे, असे आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले.