रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य! नागरिकांसह वाहनचालक त्रस्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतीच्या आगमनामध्ये विघ्न येऊ  नये म्हणून ग्रीट मातीने भरलेले खड्डे गेल्या दोन दिवसांपासून उपद्रवाचे कारण ठरू लागले आहेत. रस्त्यांवर सध्या धुळवड पाहावयास मिळत आहे. वाहनचालकांसह नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. सर्दी-खोकला आणि श्वसनाचे विकार वाढत आहेत.

पालघर शहरातील माहीम रस्ता, बोईसर रस्ता, स्थानक परिसर रस्ता, देवीसहाय रस्ता, मनोर-माहीम राज्यमार्ग तसेच बोईसर, मनोर आदी ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत रस्त्यावरील खड्डय़ांवर खडी, माती आणि ग्रीट पावडर टाकून ते बुजविण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तसेच गणेशोत्सव आगमन होत असताना या ग्रीट पावडर व पावडरसदृश खडी वाहनांच्या चाकांच्या प्रवाहात येऊ न हवेत मिसळत असल्यामुळे शहरात धुळीचे धुके पसरल्याचे वातावरण आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांसह दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते, फळ-भाजी विक्रेते यांना त्रास होत आहे. डोळे चुरचुरणे, डोळे लालसर होणे तसेच श्वसनाचे आजार वाढत आहेत. या धुळीमय वातावरणामुळे डस्ट एलर्जी, डोळे चरचरणे, केसांत धूळ जाऊ न कोंडा होणे, घसा खवखवणे आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे.

काय करावे?

घराबाहेर पडताना जवळ पाण्याची बाटली ठेवा. पाण्याचे तसेच द्रवरूप पदार्थाचे सेवन अधिक करावे. जिथे प्रदूषण अधिक आहे, तिथे नाकाला रुमाल लावून बाहेर पडा, त्यामुळे होत असलेल्या खोकल्याला अटकाव करता येतो. डस्ट मास्क वापरा, तो फुप्फुसात जाणारे कण अडवण्याचे काम करतो. डोळ्यांना गॉगल लावा जेणेकरून ही धूळ डोळ्यांत जाणार नाही. अधिक त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उपाययोजना करा

शहरातील पादचारी, नागरिकही या धुळीमुळे त्रस्त आहेत. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा व्यथा त्यांनी मांडल्या आहेत.

बोईसर रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. या ठिकाणाहून जाताना खड्डे आणि धूळ यामुळे खूप त्रास जाणवतो. उपाययोजनांची गरज आहे.

– जान्हवी पाटील, पालघर-बोईसर रस्ता महिला प्रवासी

या रस्त्यावरून जाताना धुळीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कपडे खराब होत आहेत. नाका-तोंडातही धूळ जात असल्यामुळे खोकला होतो.

– प्रथमेश प्रभू तेंडोलकर, विद्यार्थी

श्वसनाचे आजार बळावू शकतात. जास्त प्रमाणात धूळ असेल तर श्वास कोंडू शकतो. अशा वेळी स्वच्छ कपडय़ाने किंवा मास्कने तोंड बांधावे. धुळीतून प्रवास केल्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड, डोळे, हात-पाय धुऊन घ्यावेत.

– सागर पाटील, आरोग्य अधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dust kingdoms on the palghar roads
First published on: 13-09-2018 at 02:59 IST